सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कॉरंटाईन झालेल्या रुग्णांची घरे असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:55 PM2020-07-01T17:55:24+5:302020-07-01T17:58:17+5:30
सोलापूर शहरातील दुसरी घटना; मालकासह भाडेकरचे घर फोडून चोरून नेला दिड लाख रुपयांचा ऐवज
सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कॉरंटाईन झालेल्या मालकासह भाडेकरूचे घर फोडून अज्ञात चोरट्याने आतील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार दि. ३० जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. शहरात चार दिवसांमध्ये घडलेली ही दुसरी घटना असून, कॉरंटाइन झालेल्या रुग्णांची घरे असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
चार दिवसापूर्वी बुवा गल्ली भूषण नगर येथील एका घरातील व्यक्तीला कोरोना चे लक्षण आढळून आले, त्यामुळे तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. स्वाईब तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाला आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने संबंधित व्यक्तीच्या घरातील कुटुंबीयांना व त्यांच्या येथे राहणाºया भाडेकरूंना केळगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कॉरंटाईन करण्यात आले होते. घर मालक व भाडेकरू हे सर्वजण कॉरंटाइन झाल्यामुळे घराला कुलूप लावण्यात आले होते.
घरात कोणी नसल्याचे व सर्वाना कॉरंटाईन केल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत, घर मालकाच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाट फोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने व किचन रूम मधील गॅसची टाकी चोरली. एवढ्यावर चोरटे न थांबता त्यांनी शेजारीच असलेल्या भाडेकरूच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व तेथील कपाटातून सोन्याचे दागिने व गॅस टाकी असा सर्व मिळून १ लाख ४७ हजार ४०० रुपये किंमतीच्या ऐवजाची चोरी केली. दोन्ही घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शेजारी राहणाºया लोकांनी संबंधित घरमालकास फोन करून याची माहिती दिली. चोरीची माहिती सलगर वस्ती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी नातेवाईक किरण राम व्हॅनकोरे (वय २५, रा रेल्वे लाईन, कोनापुरे चाळ, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसनुर हे करीत आहेत.