'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही'
By राजा माने | Published: December 24, 2018 04:19 PM2018-12-24T16:19:45+5:302018-12-24T17:33:52+5:30
कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत.
राजा माने
सोलापूर - कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. मात्र, शिवसेना याबाबतीत गंभीर नसून भाजपाचे ते एकतर्फी प्रेम असल्याचे सांगते. त्यामुळे या प्रेमात ऑनर किलींग कोणाचा होईल, की हे प्रेम सफल होणारंय ? असा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना, यामध्ये कुणाचाही ऑनर किलींग होणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.
आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भारतीय जनता पार्टी मजबूत असून त्यात कील होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटलं. पुढ बोलताना ते म्हणाले की, मुलगा मोठा झाला की आईला बघत नाही म्हणून आई त्याच्यावरील प्रेम कमी करत नाही. जर, मुलगा म्हटलेलं शिवसेनेला आवडत नसेल तर दोन भावांचंही उदाहरण देता येईल. आता, आमच्या घरात तीन मांजरं आहेत, त्यातली दोन मांजरं एका आईची आहेत. त्यातलं तिसरं मांजर आहे ते दुसरीचं. मग, त्या दोघा मांजरांच एकमेकांवर खूप प्रेमय, पण तिसरीशी नाही. तसं, सर्वच राजकीय पक्ष आमचे मित्र असावेत, असंही काही नाही. मात्र, हे आमचे सख्खे भाऊ आहेत, त्यामुळे त्यांच आमच्यावर जरा जास्त प्रेम आहे. आमच्या दोघांच्याही रक्तात हिंदुत्व आहे, त्यामुळे ते कसेही वागू आम्ही शेवटपर्यंत हेच म्हणणार. तसेच, यापूर्वी 2014 मध्ये आम्ही वेगळे लढलो, म्हणून काय आमचा पाया ढिसूळ झाला का, असा प्रतिप्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला. आम्ही दोन खासदारांपासून ते सत्ताधारीपर्यंत मजल मारल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
दरम्यान, शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिर मुद्द्याबाबत उत्तर देताना पाटील म्हणाले, राम मंदिर हा ना भाजपाचा मुद्दा आहे, ना संघाचा, ना शिवसेनेचा. राम मंदिर हा देशातील प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा, मग तो मुस्लीम का असेना. त्यामुळे शिवसेनेनं हा मुद्दा उचलून धरला तर त्यात बिघडलं काय, शेवटी कुणाच्याही कोंबड्यानं का हुईना, सूर्य उगवला म्हणजे झालं, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिराच्या प्रश्नावर उत्तर दिलं.