पापरीमध्ये ग्राम सुरक्षा समितीचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:07+5:302021-07-10T04:16:07+5:30
मोहोळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्य विभाग व ग्राम संरक्षक कमिटीने कोरोनाला हद्दपार केलेल्या ...
मोहोळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आरोग्य विभाग व ग्राम संरक्षक कमिटीने कोरोनाला हद्दपार केलेल्या पापरी गावाच्या ग्राम सुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेतील सहभागी कर्मचाऱ्यांचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच अमोल भोसले, ग्रामविकास अधिकारी अनंत नकाते, आरोग्य केंद्रप्रमुख सीमा कांबळे, आरोग्यसेवक कैलास माळी, विस्तार अधिकारी बागवाले उपस्थित होते.
ग्राम विकास अधिकारी अनंत नकाते यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून गावचे संरक्षण करण्यासाठी माझे दुकान माझी जबाबदारी याअंतर्गत सर्व दुकानदारांची कोरोना चाचणी करून घेतली. दुकानांच्या वेळा निश्चित करून ग्राहकांची फिजिकल डिस्टन्सिंगबाबत नियमावली तयार केली. आरोग्य विभागामार्फत गावामध्ये शिबिर आयोजित करून नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील नागरिकांची तत्काळ कोरोना चाचणी केली. त्यामुळे संसर्ग साखळी खंडित होण्यास मदत झाली.
यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
----
फोटो : ०८ पापरी
पापरीत ग्राम सुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गोटे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर.
----