सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:01 IST2025-03-26T09:00:46+5:302025-03-26T09:01:28+5:30
धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते.

सोलापुरात भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर; धडकेत बाईकचा चक्काचूर
Solapur Accident: डाळिंब वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप जीपने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ७:३०च्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय ५०) व सुवर्णा धनंजय क्षीरसागर (वय ४४) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे, तर ब्रह्म धनंजय क्षीरसागर (वय १२, सर्वजण रा. चिंचोली रोड सांगोला) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत गणेश दत्तात्रय कमलापूरकर यांनी पोलिसात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
धनंजय क्षीरसागर हे बँक ऑफ महाराष्ट्र शिरभावी शाखेत कॅशियर आहेत. मुलगा ब्रह्म हा यशवंत हायस्कूल शिरभावी येथे इयत्ता ५ वीत शिक्षण घेत होता. पत्नी सुवर्णा क्षीरसागर घरी टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या. धनंजय क्षीरसागर हे मंगळवारी सकाळी ७:३० च्या सुमारास दुचाकीवरून पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांना सोबत घेऊन निघाले होते. वाटेत चिंचोलीजवळील पेट्रोलपंपानजीक इंगळे वस्ती समोर शिरभावी रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप जीपने क्षीरसागर यांच्या दुचाकीस समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.