कोरोनाची धास्ती; आधीच मुहूर्त कमी, त्यातही बुकिंग थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:02 PM2020-03-16T13:02:28+5:302020-03-16T13:04:57+5:30
१५ एप्रिलपर्यंत दोनच मुहूर्त; आता मंगल कार्यालय प्रमुखांना प्रतीक्षा ग्राहकांची
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : कोरोना आजाराचा फटका फक्त काही शासकीय, खासगी कामालाच नाही तर मंगल कार्यालादेखील बसला आहे. येत्या महिनाभरात १९ मार्च आणि १५ एप्रिल असे दोनच मुहूर्त आहेत. मुहूर्त कमी असल्याने त्या दिवशी लग्न, वाढदिवस, साखरपुडा, बारसे आदी कार्यक्रमांसाठीचे नियोजन केले जाते. मात्र सध्या मंगल कार्यालयासह मंगल भांडार, केटरर्स यांच्याकडे बुकिंग होत नसल्याचे चित्र आहे.
शहरात सोलापूर मंगल भांडार असोसिएशन अंतर्गत ७५ सदस्य आहेत. तर या संघटनेकडे नोंदणी नसलेले छोटे-मोठे असे सुमारे १०० मंगल भांडार व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडेही बुकिंगची हीच स्थिती असल्याचे सोलापूर मंगल भांडार असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी सांगितले. लग्न समारंभ असल्यास महिन्याआधी बुकिंग करण्यात येत असते तर छोटे कार्यक्रम असल्याने चार ते आठ दिवस आधी बुकिंग करतात. सध्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे बुकिंग होत नाही.
सामुदायिक ठिकाणी गर्दी झाल्यास आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी शासनाने असे कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे कार्यक्रमांचे नियोजन केले जात नाही. तसेच मार्च महिन्यात मुहूर्त कमी असल्याने खूप कमी प्रमाणात असे कार्यक्रम होत आहेत.
रविवारचा नियोजित कार्यक्रम रद्द
- जुळे सोलापूर येथे १५ मार्च रोजी प्रथमेश स्पोर्ट क्लबतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी इव्हेंट कंपनी व मंगल भांडार यांना काम देण़्यात आले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये या कारणासाठी हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करुन हा कार्यक्रम रद्द केला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कार्यक्रम पुन्हा घेणार असल्याचे संयोजक ज्योतिर्लिंग शिंदे यांनी सांगितले.
एखाद्या महिन्यात कमी मुहूर्त असल्यास मुहूर्त असलेल्या दिवशी मंगल कार्यालय, मंगल भांडार यांची मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. सध्या आमची बुकिंगची वही रिकामी आहे. पुढील महिन्यात येणाºया मुहूर्तावरही कोरोनाचे संकट दिसत आहे. याचा फटका मंगल कार्यालय, केटरर्स, मंगल भांडार, इव्हेंट कंपन्या यांनादेखील बसण्याची शक्यता आहे.
- वीरेंद्र हिंगमिरे,
अध्यक्ष,
सोलापूर मंगल भांडार असोसिएशन