बाळे स्थानकावर उभारणार रेल्वेच्या २२ डब्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी हाॅस्पिटल
By Appasaheb.patil | Published: April 22, 2021 12:47 PM2021-04-22T12:47:29+5:302021-04-22T12:47:36+5:30
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी केली पाहणी, १९८कुलर्सची सोय
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे सोलापूर विभाग पुढे येत आहे. सोलापूर विभागातील बाळे रेल्वेस्थानकावर आयसोलेशन कोच उभा करण्यात येणार असून त्याठिकाणी ३०८ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
लॉकडाउनपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेली. वाढती रुग्णसंख्या पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीत आयसोलेशन कोच बनविले होते. मात्र मागील वर्षी या कोचचा वापर झाला नाही. हेच रेल्वेचे आयसोलेशन कोच वापराविना होते. मागील वर्षी तयार केलेले कोच सोलापूर विभागात आणि अन्य ठिकाणी आहे तशाच स्थितीत ठेवण्यात आलेले होते. मात्र यंदा रुग्णसंख्या वाढत असल्याने रेल्वे कोचचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे सोलापूर स्टेशनवर ठेवण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोचचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर होत आहे.
जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केली पाहणी
कोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे आयसोलेशन कोच सुरू करण्याबाबत प्रशासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त विजय खोरोटे व रेल्वेचे उपविभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, यातायात प्रमुख संजीव अर्धापुरे यांनी बाळे रेल्वे स्टेशनची पाहणी करून सोलापूर रेल्वेस्थानकावर असलेल्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वरील कोचची पाहणी केली.
रेल्वे कोचमध्ये आयसोलेशन कोच उभारणीसंदर्भात प्राथमिक स्तरावर पाहणी केली. याचवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आयसोलेशन कोच बाळे रेल्वेस्थानकावर उभा करण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबत बाळेस्थानकाचा पाहणी दौरा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसमवेत झाला. लवकरच याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.
- विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर महापालिका
या असतील सेवासुविधा...
- रुग्णांना रेल्वेकडून ‘या’ सुविधा -मध्य रेल्वेकडून सोलापूर रेल्वे स्थानकावर २२ आयसोलेश कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- प्रत्येक कोचमध्ये १४ याप्रमाणे ३०८ खाटांची सुविधा होणार आहे.
- सोलापूरमधील हॉस्पिटल्सवरील भार होणार कमी
- प्रत्येक कोविड रुग्णांसाठी एक बेड रोल, उशी, नॅपकिन कचऱ्याचा डबा देण्यात येणार आहे.
- विशेष म्हणजे उन्हाळा असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका डब्यात नऊ कुलरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- रेल्वेच्या डब्यावर पोते अंथरण्यात येणार आहे. एका डब्यात दोन ऑक्सिजन सिलिंडर असणार आहे.