हॉस्पिटल, हॉटेल अन् बसस्थानकाची जागा जाणार, सोलापुरात उड्डाणपुल होणार!
By Appasaheb.patil | Published: January 24, 2023 02:09 PM2023-01-24T14:09:05+5:302023-01-24T14:09:18+5:30
३० जणांना मिळणार आठ कोटी, पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम पूर्णत्वास
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरात होत असलेल्या प्रस्तावित जुना पुना नाका ते पत्रकार भवन या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाची पहिल्या टप्प्यात कार्यवाही वेगाने सुरू झाली आहे. बाधित मिळकतीची मोजणी करून खुणा करण्यात आल्या आहेत. शिवाय बाधित मिळकती ताब्यात घेण्याबरोबरच कब्जाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात हॉस्पिटल, हॉटेल अन् बसस्थानकाच्या मुख्य इमारतीला कोणताही धक्का लागणार नसून फक्त कंपाउंडची भिंत जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर शहरातून जुना पुना नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे विविध दोन मार्गांवरील दोन उड्डाणपूल होणार आहेत. शहरातील जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी चौक, भय्या चौक, रेल्वे स्टेशनमार्गे विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाची कार्यवाही महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या दरम्यानच्या बाधित मिळकतींचा सर्व्हे, मूल्य निर्धारण प्रक्रिया व इतर बाबी पूर्ण झाल्यानंतर आता भूसंपादन विशेष घटकाने सुचित केल्यानुसार बाधित मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यासाठी विविध भागाचे टप्पे पाडण्यात आले आहेत.
ताबा पावतीवर संबंधित मिळकतदारांच्या सह्या
पहिल्या टप्प्यात २० जानेवारी २०२३ पासून जुना पुना नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी चौकादरम्यान असलेल्या बाधित ३० मिळकती ताब्यात घेण्यास प्रारंभ करण्यात आहे. पाच टप्प्यात बाधित मिळकती ताबा पावतीवर संबंधित मिळकतदारांच्या सह्या घेण्याची सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून मालमत्ता पत्रकावर नाव लावण्याची पुढील कार्यवाही होणार आहे.
सात-बारा उतारावर महापालिकेचे नाव लागणार
जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागातील बाधित मिळकती ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. या भागात एकूण ३० मिळकती बाधित झाल्या आहेत. या मिळकती ताब्यात घेतल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे कामासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक अभियंता दिवाणजी यांनी दिली.
उड्डाणपुलासाठी मिळकती ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. ताबा दिल्यानंतर संबंधितांना भूसंपादनाचे पैसे मिळणार आहेत. विकासकामाला कोणीही विरोध करू नये. भूसंपादन कायद्यानुसार सर्वांना योग्य ताे मोबदला मिळणार आहे. शिवाय शिपटिंग चार्जेस व अन्य गोष्टींही मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोणत्याही मिळकतदाराची मूळ इमारतीला धक्का लागणार नाही, फक्त कंपाउंडची भिंत बाधित होणार आहे. - केशव जोशी, भूसंपादन अधिकारी, सोलापूर महानगरपालिका.