कोरोना पॉझिटिव्ह पतीवर रूग्णालयात उपचार; इकडे पत्नीवर पोलिसानेच केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 12:31 PM2021-05-25T12:31:17+5:302021-05-25T12:31:21+5:30
घरात एकटी असल्याची संधी : अधून-मधून तो एसएमएस करायचा
सोलापूर : घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलिसाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि.२३ एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला.
रवी मल्लिकार्जुन भालेकर (रा. सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रवी भालेकर हा पीडित महिलेला मेसेज करीत होता. जाता-येता रस्त्यावरून थांबून खिडकीकडे बघून हसत होता. बोलण्याचा प्रयत्न करून लगट करीत होता. पीडित महिलेचे पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. २३ एप्रिल रोजी रात्री पीडित महिला घरी एकटी होती. रवी भालेकर याला पीडित महिलेचा पती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याची माहिती होती. या संधीचा गैरफायदा घेत तो पीडित महिलेच्या घरी गेला. घराची बेल वाजविली. महिलेने दार उघडले तेव्हा तो आत मध्ये गेला. आतून घराची कडी लावली व तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणू लागला. तेव्हा पीडित महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने गोंधळ केलास तर यामध्ये तुझीच बदनामी होईल असे म्हणत जबरदस्तीने ओढाओढी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला फौजदार तळे करीत आहेत.