कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 03:56 PM2022-03-22T15:56:08+5:302022-03-22T15:56:18+5:30
कोविड रुग्णांचे जादा बिल परत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले रुग्णालयांना आदेश
सोलापूर : कोविड झाल्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या कोविड रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. पन्नासहून अधिक नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार केली असून, नागरिकांच्या तक्रारींवर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संबंधित रुग्णालयाच्या प्रतिनिधींची झाडाझडती घेऊन पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे पंचवीसहून अधिक रुग्णांना आता प्रत्येकी लाख रुपये पर्यंत बिले परत मिळणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रुग्णांनी, तसेच त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले असून, सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोविड बिलांच्या तक्रारींसंदर्भात बैठक झाली.
कोविड काळात उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल झालेले होते. कोविड उपचारांसाठी शासनाने काही नियम जाहीर केले. कोविड बिलांची रूपरेषाही शासनाने जाहीर केलेली होती. बिलांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. यापूर्वी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ज्यांनी तक्रार दिली त्यांच्या बिलांचे पुन्हा एकदा ऑडिट करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिले. आदेशानुसार फेर ऑडिट झाले. ऑडिट झाल्यानंतर बिलांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली. संबंधित चूक रुग्णालयाच्या निदर्शनास आणून दिले. तफावतीचे बिल लवकर अदा करण्याचे आदेश शंभरकर यांनी सोमवारी दिले.