बाळंतिणीला दाखल करून घेण्यास हॉस्पीटलचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:02 PM2019-05-29T12:02:38+5:302019-05-29T12:06:30+5:30
सोलापुरातील धक्कादायक घटना: आयुक्त अविनाश ढाकणे गेल्यानंतर आरोग्य व्यवस्था पुन्हा कोलमडली
सोलापूर : प्रसूतीसाठी डफरीन हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका बाळंतिणीला कर्मचाºयांनी आल्यापावली परत पाठविल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.
शेळगी परिसरात राहणारी विवाहिता त्रास होऊ लागल्याने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला वडिलांसमवेत उपचारासाठी डफरीन हॉस्पिटलमध्ये आली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या कर्मचाºयांनी तिला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला.
वजन कमी आहे, डिलिव्हरीच्या वेळी त्रास होईल, आता डॉक्टर नाहीत, अशी कारणे सांगून तिला परत पाठविले. विशेष धक्कादायक बाब म्हणजे त्या विवाहितेने प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या डफरीन हॉस्पिटलमध्येच केल्या होत्या. असे असतानाही कर्मचाºयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने त्या विवाहितेला रात्री साडेअकरा वाजता खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे नॉर्मल डिलिव्हरी झाली, मात्र डफरीनमधील कर्मचाºयांनी दिलेल्या वागणुकीबाबत त्या विवाहितेच्या पित्याने संताप व्यक्त केला.
महापालिकेच्या प्रसूतिगृहातील दुरवस्थेमुळे शासकीय रुग्णालयाच्या सेवेवर ताण येत होता. त्यामुळे महापालिकेची आरोग्य सेवा तत्पर करावी, यासाठी आम्ही मदत करू, असा प्रस्ताव तेथील डॉक्टरांनी दिला होता.
त्यावर तत्कालीन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी महापालिकेची प्रसूतिगृहे सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. रामवाडी, डफरीन, बॉईज प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. १८ वर्षांनी डफरीनमधील शस्त्रक्रिया विभागातील नळाला पाणी आले होते. या सुधारणेनंतर महापालिकेच्या दवाखान्यात नॉर्मल प्रसूती होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केला होता.
चांगल्या सुविधेमुळे शहर आणि परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया अनेक गरीब महिलांना आधार मिळत आहे. पण पुन्हा गेल्या काही दिवसांपासून प्रसूतिगृहातील कर्मचाºयांची अरेरावी सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बाळंतीणला दाखल करून न घेता परत पाठविणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. महापालिकेची आरोग्य सेवा गरिबांसाठी आहे. मी याबाबत लवकरच बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडेन.
-राजेश काळे,
सभापती, आरोग्य समिती
मी रजेवर आहे. सर्व कर्मचाºयांना रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या डॉ. सोडल यांच्यावर डफरीन हॉस्पिटलची जबाबदारी आहे. काय प्रकार घडला याची मी त्यांच्याकडे चौकशी करेन.
-डॉ. संतोष नवले,
आरोग्य अधिकारी