पिसाळलेली कुत्री पकडण्यापूर्वी काढले जातात फोटो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 07:34 PM2019-08-12T19:34:41+5:302019-08-12T19:35:46+5:30
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने सप्टेंबरअखेर मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर : शहरातील भटकी कुत्री आणि मांजरांच्या निर्बिजीकरणासाठी मनपाकडून दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे. यावर्षी ४५०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालय प्रमुख डॉ. शुभांगी ताजणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांनी लहान मुले, महिलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महापालिकेने २०१४ मध्ये कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबविली. ही मोहीम सुमारे सहा महिने चालली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या, पण महापालिकेने दुर्लक्ष केले. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या काळात २०१८ मध्ये पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी ३० लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली. परंतु, त्यासाठी मक्तेदार पुढे आले नाहीत. डॉ. ढाकणे आणि प्राणी संग्रहालयाच्या प्रमुख डॉ. शुभांगी ताजणे यांनी इतर महापालिकांशी संपर्क करुन मक्तेदाराला बोलाविले.
फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत शहरातील ४८०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. आता पुन्हा निर्बिजीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी त्याला मान्यता दिली आहे. पुढील दोन दिवसांत निविदा जाहीर होईल. सप्टेंबरअखेरपासून कुत्री आणि मांजरांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. ताजणे यांनी सांगितले.
डॉ. ताजणे म्हणाल्या, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी १५०० ते १६०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, त्यापेक्षा कमी दराचा प्रस्ताव देणाºया संस्थेला निविदा दिली आहे. मनपाने मागील वर्षी एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी ६५५ रुपयांप्रमाणे निविदा भरणाºया मक्तेदाराला काम दिले होते. यंदाच्या वर्षीही लवकरात लवकर निविदा मंजूर करुन मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ उपद्रवी कुत्र्यांची धरपकड मोहीम
च्होटगी रोडवरील हत्तुरे वस्ती, शंकरनगर, बसवेश्वरनगर या भागात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी सिध्देश्वर साखर कारखाना परिसरातील बसवेश्वरनगर येथे भटक्या कुत्र्यांनी तीन लहान मुलांना चावा घेतला. या भागात सोमवारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाची टीम जाणार आहे. सध्या नागरिकांच्या तक्रारीनुसार पिसाळलेली, उपद्रवी कुत्री पकडण्यात येत आहेत. प्रथम त्यांचे फोटो काढले जातात. केवळ उपद्रवी कुत्र्यांनाच पकडण्यात येत असल्याचे डॉ. ताजणे यांनी सांगितले.