हॉटेलचे मालक सोलापुरी...किचनमधील वस्ताद मात्र नेपाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:08 PM2019-06-01T12:08:21+5:302019-06-01T12:11:26+5:30
परप्रांतियांच्या साम्राज्यात सोलापूरची बाजारपेठ; वेटर अन् कॅप्टनच्या कामात बिहारी ठरलेत भारी !
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : सोलापुरात काही नाही... इथे खूप काही आहे... म्हणूनच नेपाळ देशातील बावर्चींनी इथल्या हॉटेल्समधील किचन रूमवर ताबा मिळविला आहे. आचारीचे काम असो अथवा ग्राहकांना सेवा देण्यासाठी वेटर असोत, बिहारीबाबूंसह अन्य प्रांतातील युवक सोलापूरच्या संस्कृतीत पूर्णत: समरस होऊन गेले आहेत. बावर्चींसह वेटर मंडळींंनी मराठी भाषा तर अवगत केली आहे. शिवाय हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांमुळे हे परप्रांतीय कन्नड, तेलुगू भाषाही बोलण्याचा प्रयत्न करताहेत.
सोलापुरात जवळपास ८४ परमिट रूम आहेत. व्हेज-नॉनव्हेज असलेले जवळपास ३०० फॅमिली रेस्टॉरंट आहेत. रोजच्या घरातील जेवण्याच्या चवीला कंटाळलेले सोलापूरकर कधी-कधी फॅमिलीसोबत हॉटेलमधील भोजनाचा आस्वाद घेतात. अस्सल सोलापुरी जेवणापेक्षा पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियनसह अन्य प्रांतातील विविध पदार्थांची चव चाखण्यावर इथल्या ग्राहकांचा कल असतो.
हाच धागा पकडून हॉटेल्स चालकांनी परप्रांतातील बावर्चींना अर्थातच आचाºयांना बोलावून घेतले. नेपाळसह पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, कर्नाटक आदी राज्यांमधील बावर्ची आणि वेटर इथल्या बहुतांश हॉटेलमध्ये दिसतात.
एखाद्या हॉटेलमध्ये ग्राहक आला तर तो भट्टी खोलीतील आचारीस बोलावून घेतो आणि त्याच्या आवडी-निवडीनुसार पदार्थांची आॅर्डर देत असतोे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये परप्रांतीय वेटर आपली सेवा देताना ग्राहकांना तेज क्या मीडियम अशी विचारणा करूनच तो पदार्थांची यादी किचनमधील बावर्चीला देत असतो. कधी-कधी घरात मांसाहार न करणारे हॉटेलमध्ये येऊन मांसाहार पदार्थ खाणारे ग्राहकही कमी नाहीत. विशेषत: फिश फ्राय, फिश करी, फिश क्रेप्सी यासह चिकन, मटनमधील विविध पदार्थ बनविण्यातही आचाºयांचा विशेष हातखंडा आहे.
साब, हम अभी शोलापूरके हो गये...
- जुळे सोलापुरातील एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तेथे नेपाळमधील चार बावर्ची किचन रूममध्ये पदार्थ बनविण्यात व्यस्त होते. प्रकाश कोहली सांगत होता, ‘साब, १५ साल पहले मै शोलापूरमे आया. उससे पहिले मुंबईमे केटरिंग का कोर्स किया. मै और मेरे तीन साथी मराठी बात करते है. हम अभी शोलापूरके हो गये. पवन कोहली, किसन कोहली आणि शिवा विश्वकर्मा हे गेल्या १५ वर्षांपासून सोलापुरात स्थायिक झाले आहेत. पैकी प्रकाश आणि किसन हे कुटुंबीयांसह इथेच वास्तव्य करत आहेत.
स्वच्छतेवर अधिक भर...
- हॉटेलमधील आचारी असतील अथवा परप्रांतीय वेटर. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून हे बावर्ची आणि वेटर डोक्यावर विशेष टोपी आणि हातमोजे घालूनच ग्राहकांना सेवा देत असतात. जेव्हा असे चित्र हॉटेलमध्ये दिसते तेव्हा ग्राहकांचे पाय आपोआप अशा हॉटेल्सकडे वळताना दिसतात.
परप्रांतातील वेटर ठेवण्यामागे ग्राहकांचा आनंद हेच मुख्य कारण आहे. त्यांची प्यारी हिंदी भाषा आणि ग्राहक हेच दैवत हा त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे ग्राहक पैशाकडे कधीच पाहत नाहीत. उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने ग्राहक आवर्जून हॉटेल्समध्ये हजेरी लावत असतात.
-संजय इंदापुरे,
उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य खाद्यपेय महामंडळ.
परप्रांतातील आचारी, वेटर नेहमीच वेळा पाळतात. एखादे काम मनापासून करण्याची त्यांची शैली असते. आम्ही सांगण्याच्या आधीच परप्रांतातील ही मंडळी स्वच्छतेवर भर देत असतात. त्यांच्या राहण्याची, जेवण्याची सोय होत असल्याने ते सोलापुरातील हॉटेल व्यावसायिकांवर खूश असतात.
-सीताराम शिखरे,
हॉटेल व्यावसायिक.