खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:11 PM2018-06-29T14:11:34+5:302018-06-29T14:15:17+5:30

The house of his brother, brother of four, died due to family dispute, | खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू

खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू

Next
ठळक मुद्देस्फोट झाल्याने शेजारच्यांना हा प्रकार समजला15 मिनिटात पोलीस घटनास्थळीघटनास्थळी सोलापूर येथून फॉरेन्सीक लॅबचे पथक दाखल

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी - घरातील कौटुंबिक वादातून थोरल्या भावाने झोपेत असलेल्या आई व पोलीस असलेल्या भावासह भावाची पत्नी व लहान मुलगा यांना अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थाने पेटवून देवून हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास खांडवी तालुका बार्शी येथे घडली. कस्तुरबाई कुरुंदास देवकते (वय 65), राहुल कुरुंदास देवकते (वय 35), सुषमा राहुल देवकते (वय 30) व आर्य राहुल देवकते (वय 2) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खांडवी येथे आई कस्तुरबाई व त्यांची दोन मुले राहुल व रामचंद्र व त्यांचे कुटुंब असे एकत्र राहत होते. शेती हा कुटुंबाचा व्यवसाय आहे. दोन्ही भावात मिळून 12 एकर शेती आहे. मयत झालेला राहुल हा सध्या उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता तर रामचंद्र हा शेती करत आहे. राहुल हा दररोज उस्मानाबादवरुन ये-जा करुन नोकरी करत होता. मागील एक महिन्यापूर्वी भावाभावात वाद झाल्याची कुजबुज गावकर्‍यात होती. शुक्रवारी मध्यरात्री राहुल याचे कुटुंब व आई घरात झोपले असताना रामचंद्र उर्फ तात्या कुरुंदास देवकते (वय 37) याने झोपेत असलेल्या वरील चौघांच्या अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर स्फोट झाल्याने शेजारच्यांना हा प्रकार समजला. घरामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याने कोणाला आत जाता आले नाही. 15 मिनिटात पोलीस घटनास्थळी आल्यानंतर गावकर्‍यांनी पोलिसांच्या मदतीने भाजलेल्या चौघांंना बाहेर काढले. यामध्ये आर्य व सुषमा यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला होता तर राहुल व आई कस्तुरबाई यांना उपचारासाठी बार्शी व त्यानंतर उस्मानाबादमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये रामचंद्र हा देखील भाजला असून त्याच्यावर उस्मानाबाद येथे उपचार चालू आहेत. 

सकाळी घटनास्थळी सोलापूर येथून फॉरेन्सीक लॅबचे पथक दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु केली होती. घटनास्थळी रॉकेलचे कॅन, लाकडी काठी आदी साहित्य दिसून येत होते. याबरोबरच पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे, तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, रात्री गस्तीचे जाधव, तालुका पोलीस स्टेशनचे तानाजी धिमधिमे, राजेंद्र मंगरुळे, एस.एस. माने, आप्पा लोहार, घोगरे, बेंद्रे, माशाळ, लाड आदी कर्मचारी उपस्थित होते. 

  • उस्मानाबाद येथे उपचार घेत असलेल्या रामचंद्र देवकते याने सदरची घटना ही घरातील चिमणीने आग लागून घडली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही घटना नेमकी चिमणीमुळे घडलेली दुर्घटना आहे की रामचंद्र याने केलेली हत्या आहे हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी दुपारी 12 पर्यंत गुन्हाही नोंद झालेला नव्हता. फॉरेन्सीक लॅबचा अहवाल रामचंद्र याच्या पत्नीचा जबाब व पोलीस तपासातच नेमके काय घडले हे समोर येणार आहे.

Web Title: The house of his brother, brother of four, died due to family dispute,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.