हौसेने घर बांधलं... दिवाळीत लग्न लावायचं होतं, पण...; मुलाच्या अपघाती मृत्यूनं वडिलांना दुःख अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:46+5:302021-04-19T10:57:51+5:30
लॉकडाऊनमुळे कंपनीनं सुट्टी दिल्यानं दोन भाऊ घरी परतत होते; पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला
केगाव बु. या छोट्याशा गावात विद्युतपंप दुरुस्त करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज आणि अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल या दोघांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोघांना जड अंत:करणाने मूळगावी स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांना शोक अनावर झाला होता.
जिल्ह्यातील अनेक मुले उच्चशिक्षित झाले की, हाताला काम मिळावे, या हेतूने आई-वडिलांना सोडून कामासाठी पुणे, मुंबई अशा शहरांत जातात. त्यातीलच हे दोन तरुण. पुणे येथे गेले होते. पंकज (वय २७), राहुल (वय २५) हे मागील तीन वर्षांपूर्वी भविष्य घडविण्यासाठी गाव सोडून गेेले. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी जाहीर केली. पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद, मग या मुलांनी काय करावं? पर्याय एकच, संचारबंदी संपेपर्यंत गावाकडे जाणे. त्यानुसार, शनिवारी पंकज आणि राहुल दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले; पण रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.
पंकज हा इरप्पा देसाई यांचा मोठा मुलगा. मुलाचे लग्न करावे म्हणून हौसेने नातेवाइकांच्या मदतीने गावात घर बांधले. फरशीचे काम सुरू होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या आतच पंकज वडिलांना सोडून गेला.
पत्नीनंतर आता मुलगाही गेला, आता कुणाकडे बघून जगावे
सिद्धाराम देसाई यांच्या पत्नीचे हृदयविकाराने यापूर्वीच निधन झाले होते. आता ज्याच्याकडे बघून आशेने जगावे, तो मुलगाही गेला. आता कुणासाठी जगावे, अशी भावना सिद्धाराम देसाई यांनी व्यक्त केली.
तरुणाई बेचैन
केगावमधील तरुणांमध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज आणि राहुल या चुलत भावांनी घरच्यांना आणि गावातील काही मित्रांना फोनवरून गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. आपले मित्र येणार असे वाटत असताना त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच सर्वच दु:खी झाले.
पोलीस कारवाईच्या भीतीने रात्रीच निघाले
संचारबंदीमुळे दिवसा पोलीस कारवाई करतील, या भीतीने रात्रीच ११ वाजून ५० मिनिटांनी काळेवाडीफाटा येथून हे बंधू दुचाकीवरून निघाले. अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली अन् हे दोघे जागीच ठार झाले. पंकज हा पेटीएम कंपनीत इंजिनीअर म्हणून होता, तर राहुल हा कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.