सोलापुरातील घरांच्या किंमती महागणार; रेडिरेकनर दरात १.२७ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:37 PM2020-09-12T12:37:14+5:302020-09-12T12:39:20+5:30
आजपासून अंमलबजावणी: महापालिका क्षेत्रात ०.६२ तर नगरपालिकेत ०.९९ टक्के वाढ
सोलापूर : राज्य शासनाने रेडिरेकनरच्या दरात शनिवार दि. १२ सप्टेंबरपासून सरासरी १.७४ टक्के वाढ केली असून, सोलापूर जिल्ह्यासाठी सरासरी १.२७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
कोरोना साथीमुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे या वर्षीच्या आर्थिक वर्षात रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर झाले नव्हते. त्याचबरोबर सन २०१६ ते २०१९ या काळातही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे जुन्याच दराने आकारणी केली जात होती. पण आता शासनाने रेडिरेकनर दरवाढ जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर महापालिका क्षेत्रासाठी ०.६२ टक्के, नगरपालिका क्षेत्रासाठी ०.९९ टक्के, ग्रामीण क्षेत्रासाठी ०.८७ टक्के आणि प्रभाव क्षेत्रासाठी २.६१ टक्के वाढ केली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ झाल्याने मुद्रांक शुल्कात वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ करताना प्रभाव क्षेत्राच्या टक्केवारीत जादा वाढ सुचविली आहे. बाजारपेठ, मुख्य गावठाण, महामार्ग, हद्दवाढ, धरणक्षेत्र, पाझर तलाव, कालवे अशी प्रभाव पाडणारी जी क्षेत्रे आहेत तेथील जागेच्या दरात वाढ होणार आहे.
रेडिरेकनर म्हणजे काय?
शेती, घरजागा खरेदी करताना जे मुद्रांक शुल्क आकारले जाते त्यावेळी त्या त्या भागातील जागेचे शासनाने ठरविलेल्या दराचे पुस्तक पाहिले जाते. जागेच्या मूल्यदराला जंगम व मालमत्ता या शब्दावरून रेडिरेकनर हा इंग्रजी शब्द आला आहे. मूल्यदर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी जिल्हा, तालुका, गाव, प्रभावक्षेत्र, महानगरपालिका, नगरपालिका यानुसार स्वतंत्र दर निश्चित केला जातो. नोंदणी महानिरीक्षक किंवा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हे दर ठरविले जातात. हे दर एक एप्रिलपासून अंमलात आणले जातात.
दिले अन् काढले
कोरोना साथीमुळे महसुलात ६० टक्के घट तर खरेदी विक्रीच्या नोंदणीत ४० टक्के घट झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शासनाने १ सप्टेंबरपासून शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या नोंदणीसाठी मुद्रांकमध्ये सवलत दिली होती. याची चर्चा सुरू असतानाच आता रेडिरेकनरचे दर वाढविले आहेत. ही दरवाढ किरकोळ असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी सांगितले.