मोहोळच्या यादीत अन्य तालुके, जिल्ह्यातील मतदारांची नावे आलीच कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:55+5:302021-02-24T04:23:55+5:30
गेल्या अनेक वर्षापासून शहरात राहणाऱ्या असंख्य रहिवाशांची नावे अर्ज करूनही मतदारयादीत येत नाहीत, परंतु मागील काही दिवसांत अचानक शहर ...
गेल्या अनेक वर्षापासून शहरात राहणाऱ्या असंख्य रहिवाशांची नावे अर्ज करूनही मतदारयादीत येत नाहीत, परंतु मागील काही दिवसांत अचानक शहर वगळता बाहेरच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील मतदारांची नावे आलीच कशी असा सवाल माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केला. तरी ही नावे त्वरित रद्द करीत संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, असा इशारा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.
मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांच्या तुलनेत ५ हजार २५५ मतदार वाढलेले आहेत. म्हणजेच एकूण ३० टक्के मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये परगावच्या अनेक मतदारांची नोंदणी बोगस पद्धतीने केली आहे. मोहोळ शहराबाहेरील असलेले मतदार शोधून त्यांची नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्धी करावी. तसेच यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बारसकर यांनी कोरोना नियमाचे पालन करीत गर्दी न करता मोजक्या कार्यकर्त्यासह तहसीलवर मोर्चा काढला.
बारसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, मोहोळ नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये २०१६ ला मतदार संख्या ही केवळ १७ हजार ३८६ इतकी होती. ती पुढे मोहोळ विधानसभा २०१९ ला मतदारसंख्या वाढून २० हजार १७५ इतकी झाली. म्हणजेच २०१६ च्या तुलनेत मोहोळ नगरपरिषदेच्या २०२१ च्या मतदारांची संख्या ५ हजार २५५ इतकी म्हणजे एकुण ३० वाढ झाली आहे. पण ही वाढ काही ठराविक प्रभागातच झाली आहे. यामध्ये बाहेरील तालुक्यासह जिल्ह्यातील नावाचा समावेश आहे. बोगस नावे वाढवताना प्रशासनाच्या लक्षात ही बाब का आली नाही, असा आरोप करीत संबंधित विभागाने तातडीने ही नावे कमी करावीत अन्यथा भविष्यात शहरवासीयांच्या वतीने मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी ॲड. विनोद कांबळे, हाजी बिलाल शेख, संगीता पवार, नगरसेवक अतूल क्षीरसागर, सागर अष्टूळ, शीलवंत क्षीरसागर, रमेश सनगर, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, रवी थोरात, सिद्धार्थ एकमल्ले, ज्योती ननवरे, वर्षा दुपारगुडे, अनिता बळवंतकर, अशोक गायकवाड, सुभाष मोहोळकर, सागर गवळी, मुकेश अष्टुळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
२३मोहोळ-माेर्चा