प्रेमा तुझा रंग कसा? लाल भडक रक्ताचा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:10 PM2019-02-04T17:10:21+5:302019-02-04T17:11:20+5:30

३१ डिसेंबर २०१८ च्या अंकात ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा लेख लिहून मी २०१६ पासून चालू असलेल्या ‘कोर्ट स्टोरी’ ...

How is love your color? Bloody blood ..! | प्रेमा तुझा रंग कसा? लाल भडक रक्ताचा..!

प्रेमा तुझा रंग कसा? लाल भडक रक्ताचा..!

Next

३१ डिसेंबर २०१८ च्या अंकात ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा लेख लिहून मी २०१६ पासून चालू असलेल्या ‘कोर्ट स्टोरी’ चा प्रवास थांबवला होता. अनेक वाचकांनी प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून हा लेखन प्रवास बंद करू नका अशी मागणी केली. ‘कोर्ट स्टोरी’ चालूच राहू द्या, असा प्रेमाचा आग्रह केला. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या ‘कोर्ट स्टोरी’ चा प्रवास ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ याच लेखाने सुरू करुयात.

पूर्वीच्या ‘कोर्ट स्टोरी’ तील दुर्दैवी स्त्रीने प्रेमापोटी आपला नवरा गमावला होता व प्रेमापोटी तिच्या मुलाचा जीव धोक्यात आला होता. आजच्या ‘कोर्ट स्टोरी’ तील स्त्रीने स्वत:च्या हाताने नवºयाचा जीव गमावला होता, प्रियकराचा जीव घालवला होता तर स्वत:चा जीव देखील दिला होता. यात स्वत:च्या दोन कोवळ्या निष्पाप लेकरांचा आणि वृद्ध सासूचा जीव असून नसल्यासारखा झाला.

उच्च पदस्थ ‘क्लास वन’ नवºयाचा प्रियकराच्या साथीने खून केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिला अटक केली होती. ती अतिशय देखणी होती. लग्नापूर्वीपासून नात्यातीलच एका तरण्याबांड तरुणाशी तिचे प्रेमप्रकरण होते. त्या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करायचे ठरवले होते. त्यातच एका ‘क्लास वन’ अधिकाºयाचे स्थळ तिला चालून आले. तिच्या वडिलाकडे मागणी घालण्यात आली. त्यास वडिलांनी ताबडतोब होकार दिला. तिला लग्नाबद्दल काहीएक विचारले नाही. लग्न सोहळा थाटामाटात पार पडला.

नातेवाईक व पै-पाहुणे  सारेचजण तिच्या नशिबाचे कौतुक करीत होते. अहो, करणारच की! पण ती मात्र  मनातल्या मनात स्वत:च्या नशिबाला दोष देत राहिली. नवरा अत्यंत कष्टाळू होता. तो एक वर्षाचा असताना त्याचे वडील वारले होते. विधवा आईने मोठ्या जिद्दीने त्याला शिकवून वाढवले होते. त्यानेदेखील परिस्थितीची जाण ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केले. जिद्दीने स्पर्धा परीक्षा देऊन ‘क्लास वन’ नोकरीचे पद मिळविले. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. काही वर्षानंतर तिची व  प्रियकराची एका लग्नात गाठ पडली. तो तिला म्हणाला, आपलेदेखील असेच लग्न झाले असते तर ? पूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या आणि त्याच्या प्रेमाला पुन्हा अंकूर फुटला.

ती प्रियकराबरोबरच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की, आपण विवाहित आहोत, ही ‘लक्ष्मणरेषा’ आपण ओलांडता कामा नये हे तिच्या ध्यानात आले नाही. अनैतिकतेने तिच्या जीवनात तिची धूळधाण करण्याचे ठरवून जणूकाही प्रवेशच केला होता. तो तिला तिच्या घरी भेटायला जात असे. नवºयाला तिने हा आपला आत्येभाऊ आहे, पुण्यात शिकण्यास आहे, असे सांगितले. निष्पाप मनाच्या नवºयाने त्यावर सहज विश्वास ठेवला. मग त्यांच्या भेटीगाठी वाढत राहिल्या. आंधळ्या प्रेमवीरांना जग हे डोळस आहे याचा विसर पडला. आजूबाजूला कुजबुज सुरु झाली. नवरा ‘क्लास वन’ अधिकारी असला तरी गरीब व शांत स्वभावाचा. त्याच्या कानावर ही कुजबुज आली. तिला विचारण्याचे धाडसदेखील त्याच्याकडे नव्हते. त्याने दूर विदर्भात बदली करून घेण्याचे ठरविले. तिला ते समजले. तो तिला भेटायला आल्यानंतर तिने त्याला सांगितले.

पुण्याहून सोलापूरला येऊन हा प्रेमोद्योग करणे सहज सोपे होते. आता विदर्भात ती गेल्यानंतर आपले कसे होणार, या विवंचनेने तो व्याकूळ झाला होता. अर्थात एकमेकांच्या विरहाचे दु:ख सहन होणार नसल्याने दोघेही अस्वस्थ झाले. आपल्या प्रेमात अडथळा ठरणारा तिचा नवरा त्याला सलत होता. त्याचा काटा काढायचा डाव त्याने आखला. त्या प्लॅनला तिचीही संमती होती. प्लॅनप्रमाणे ती मुलांना घेऊन माहेरी गेली. तिच्या नवºयाचा त्याने आपल्या चुलत भावाच्या मदतीने काटा काढला. घटना कोणीही बघितली नव्हती. फक्त मोबाईलच्या टॉवरने मूकपणे बघितली होती. त्या मोबाईल टॉवरने चाणाक्ष पोलीस तपास अधिकाºयाला ती व तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचवले. तिला अटक झाली. तर प्रियकराने आत्महत्या केली.

आम्ही तिच्यावतीने जामिनासाठी अर्ज केला. तिची जामिनावर मुक्तता झाली. मुले तिच्या सासूकडे होती. मुलांना भेटण्यासाठी तिचा जीव आसुसलेला होता. त्या दिवशी तिच्या मुलाचा वाढदिवस होता. तिने सासूला फोन केला. मला मुलाला बघावेसे वाटते. त्याला माझ्याकडे आणून द्या. सासू म्हणाली, मलादेखील माझ्या मुलाला बघावेसे वाटते, त्याला माझ्याकडे आणून दे. सासूचा सवाल निरुत्तर करणारा होता. ती अत्यंत निराश झाली. फोनवरुन तिने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. दुसºया दिवशी तिच्या भावाचा फोन आला. आबासाहेब, बहिणीने गळफास घेऊन जीव दिला की हो..  तो ढसाढसा रडत होता. 
प्रेमा तुझा रंग कसा ? 
नैतिक असला तर गुलाबी, 
अनैतिक असला तर 
लाल भडक रक्ताचा..!
-अ‍ॅड. धनंजय माने

Web Title: How is love your color? Bloody blood ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.