आषाढी कशी होणार? उद्या स्पष्टता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:14+5:302021-05-27T04:24:14+5:30
१ जुलै रोजी संत तुकाराम आणि २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. परंतु, ...
१ जुलै रोजी संत तुकाराम आणि २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. परंतु, कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे यंदाही आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की, गतवर्षीप्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या जाणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि पालखी सोहळा प्रमुखांची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे एक बैठक झाली. त्यामध्ये सर्वच महाराज मंडळींनी पायी पालखी सोहळा काढावा अशी एकमुखी मागणी केली. आषाढी पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२८ मे) मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे महाराष्ट्रातील वारकरी आणि महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे.
----
कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी पालखी सोहळ्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. गतवर्षी वारकऱ्यांनी राज्य शासनाला सहकार्य केले होते. यावर्षी राज्य शासनाने वारकऱ्यांना सहकार्य करावे. मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने वारकऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे.
- ह. भ. प. नामदेव महाराज लबडे.