कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 02:41 PM2021-06-07T14:41:34+5:302021-06-07T14:41:43+5:30

तज्ज्ञांचे मत : ज्या महाविद्यालयांनी सराव परीक्षा घेतल्या नाहीत त्यांची होणार अडचण

However, everyone should take entrance test for Arts, Science and Commerce | कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी

कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी

Next

सोलापूर : आत्तापर्यंतच्या प्रवेशाच्या अनुभवानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यानुसार तेथे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेसाठी जास्त आहे, त्यानुसार महाविद्यालय स्तरावर सामायिक परीक्षा घ्यावी. कला शाखेच्या अनेक ठिकाणी जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट प्रवेश द्यावा. विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी जास्त गर्दी होत असल्यामुळे त्यासाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घ्यावी लागणार आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता प्रशासनाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे या निर्णयाचे अनेक शिक्षक तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. तर अनेकजण याचा विरोध करत आहेत. दरम्यान, परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी सीईटी घेणे हा एक मार्ग आहे. सीईटी महाविद्यालयीन स्तरावर असणार आहे का जिल्ह्यानुसार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

जर महाविद्यालय स्तरावर सामायिक परीक्षा द्यावी लागली तर एका विद्यार्थ्यास अनेक महाविद्यालयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. महाविद्यालयातून सीईटीच्या परीक्षेत शुल्कपोटी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सीईटी घेताना शिक्षण विभागाचे किंवा प्रशासनाचे त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

टॉपर विद्यार्थ्यांची जेईई किंवा नीटसाठी तयारी

कला शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शक्यतो अडचणी येणार नाहीत. वाणिज्य शाखेत काही ठराविक महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होते आणि टॉपर विद्यार्थी जेईई किंवा नीटसाठी तयारी करतात आणि उर्वरित प्रश्न राहिला तो विज्ञान शाखेकडे, त्या शाखेत प्रवेश घेताना महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे. गरज वाटल्यास प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना त्यावर नियंत्रणास सांगितल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

- हनुमंत जगताप, शिक्षण तज्ज्ञ

 

जे विद्यार्थी सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षांचे मार्क गृहीत धरले जात नाही, या विचाराने परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची टक्केवारी कमी होऊ शकते. सोबतच ज्या शाळांमध्ये परीक्षा झाल्या नाहीत किंवा परीक्षेत विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्यांच्याही मार्कांवर परिणाम होऊ शकतो.

- हनुमंत जामदार, शिक्षण तज्ज्ञ

बारावीच्या निकालाबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत. हा निर्णय देशपातळीवरचा असून बारावीवरच जेईई आणि नीटची सामायिक परीक्षा घेतली जाते. यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतरच प्रवेशाची दिशा स्पष्ट होईल.

- व्ही. पी. उबाळे, प्राचार्य,

दयानंद महाविद्यालय,सोलापूर

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. त्या परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा परिणाम होणार आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी कोणत्या पात्रतेनुसार प्रवेश मिळेल याबाबतच्या सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. पण भविष्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून शासनाने परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- डॉ. एम. डी. गायकवाड,

प्राचार्य वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर

बारावीनंतरची संधी

बारावीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा लॉ पदवी कोर्स करता येऊ शकतो. अभियांत्रिकीमध्ये पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम करता येतो, संरक्षण दलातील करिअर, लघु उद्योगक्षेत्रातील करिअर, फाईन आर्ट्स, बीसीए (बीबीए कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स), बीबीए, मनोरंजन क्षेत्रातील करिअर, संशोधन क्षेत्रातील करिअर, हॉटेल मॅनेजमेंट, मर्चंट नेव्ही आदी विषयात बारावीच्या मुलांना करिअर करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे योग्य त्या क्षेत्रात करिअर करावे, त्याप्रमाणेच शिक्षण घ्यावे असेही शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

Web Title: However, everyone should take entrance test for Arts, Science and Commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.