संचारबंदीपूर्वी पंढरपुरात प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:32+5:302021-07-17T04:18:32+5:30
आषाढी यात्रा सोहळ्याला संचारबंदीमुळे येता येणार नसल्याने गेल्या १० दिवसांपासून हजारो भाविक टप्प्याटप्प्याने पंढरपुरात दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी विठ्ठल ...
आषाढी यात्रा सोहळ्याला संचारबंदीमुळे येता येणार नसल्याने गेल्या १० दिवसांपासून हजारो भाविक टप्प्याटप्प्याने पंढरपुरात दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद असले तरी हे भाविक चंद्रभागा स्नान, नामदेव पायरी व कळसाचे दर्शन घेऊन समाधानाने परत जात असल्याने दररोज मोठी गर्दी होत होती. मात्र शुक्रवारी संचारबंदी लागू होण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर शनिवार, रविवार यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर संचारबंदी आहे. तर १८ ते २५ जुलैदरम्यान पंढरपुरात पूर्ण कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर पंढरपूरला येता येणार नाही म्हणून सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक खासगी वाहने, बसने वारी पोहोच करण्यासाठी आले होते. त्यामुळे पंढरपुरात दिवसभर मंदिर परिसर, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट, चौफाळा, प्रदक्षिणा मार्ग आदी परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता.
स्थानिकांसाठी खरेदीसाठी झुंबड
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात किराणा, भाजीपाला व इतर साहित्य पंढरपूर शहरातून जात असते. शनिवार १७ जुलैपासून २५ जुलैपर्यंत पंढरपूर शहरातील मुख्य बाजारपेठा अत्यावश्यक सेवा वगळता बंद राहणार आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह नागरिकांनी पुढील ८ ते १० दिवस पुरेल एवढा किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी पंढरपूर शहरात मोठी गर्दी केली होती. शहरातील नागरिकांन भाजीपाला, किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. शिवाय दर्शनासाठी बाहेरून आलेले नागरिक यामुळे पंढरपूर शहरात दिवसभर प्रतिवारी भरल्याचे चित्र होते. काही बाजारपेठेत खरेदीसाठी तर मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.
फोटो ओळ :::::::::::::::::
पंढरपूर शहरात संचारबंदीपूर्वी ठिकठिकाणी अशी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.