हत्तूरमध्ये गॅसचा मोठा स्फोट; चौघे गंभीर जखमी

By विलास जळकोटकर | Published: November 27, 2023 12:13 PM2023-11-27T12:13:03+5:302023-11-27T12:13:20+5:30

गॅस सुरु करताना घडला प्रकार : दोन लहान मुलं, एक वृद्धा, महिलेचा समावेश

Huge gas explosion in Hattur; Four seriously injured | हत्तूरमध्ये गॅसचा मोठा स्फोट; चौघे गंभीर जखमी

हत्तूरमध्ये गॅसचा मोठा स्फोट; चौघे गंभीर जखमी

सोलापूर : राहत्या घरी गॅसवरची शेगडी पेटवता असताना अचानक मोठा स्फोट होऊन चौघे गंभीररित्या भाजले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्धाचा समावेश आहे. जखमींना ताततडीने येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनाली महादुलिंग बबुरे (वय- २८), आरुषी महादूलिंग बबुरे (वय ३), मलकारीसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- १) आणि शावरसिद्ध सिद्धप्पा बबुरे (वय- ७०, सर्व रा. हत्तूर, ता. द. सोलापूर) असे भाजलेल्या चौघांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, हत्तूर येथील मड्डीवस्तीत राहणाऱ्या बोळूरे कुटुंबात सोमवारी सकाळी स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट झाला. यातील भाजलेल्या सोनाली या सकाळी सहाच्या सुमारास दररोजच्या प्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. गॅसचे बॅटन चालू करुन पेटवताना अचानक मोठा स्फोट झाला. काय होतेय हे समजण्यापूर्वीच आगीचे लोळ उठले यात स्वत: सोनाली यांच्यासह तीन वर्षाची आरुषी आणि एक वर्षाचा मलकारीसिद्ध दोन मुलं आणि ७० वर्षाचे वृद्ध शावरसिद्ध भाजले गेले.

यातील चौघांपैकी सोनाली यांच्या चेहऱ्यास, हातास, पाठीला भाजले. तर आरुषी हिच्याही चेहऱ्यासह दोन्ही पाय भाजले आहेत. एक वर्षाच्या शावरसिद्ध याचे हात,पाय, चेहरा गंभीररित्या भाजला आहे. वृद्ध असलेले शावरसिद्ध यांना चेहऱ्याला व दोन्ही हाताला भाजले आहे.
चौघांनाही तातडीने जवळच असलेल्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून सिलसिद्ध बबुरे यांनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्वांवर उपचर सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गॅस पाईप लिकेज असावा...
सदर घटना कोणत्या कारणामुळे घडली याबद्दल कोणालाही काही माहिती नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगताना गॅसचा पाईप लिकेज झाल्यानेच हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शीमधून सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Huge gas explosion in Hattur; Four seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.