माणुसकी जिवंत असल्यानेच कर्फ्यूतही बाबा परतले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:38 AM2020-03-27T11:38:37+5:302020-03-27T11:41:36+5:30
मुलांनी मानले देवाचे आभार; परप्रांतीयांच्या मदतीमुळे गहिवरले चव्हाण कुटुंबीय
सोलापूर : सध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहे. अशात आपल्या घरातील एखादी व्यक्ती मिसिंग झाल्यास आपली अवस्था काय होईल, हे न सांगितलेले बरे येथील गवळी वस्ती परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय व्यक्ती पाच दिवसांपूर्वी वाट चुकून थेट कर्नाटकात पोहोचली़ विजापूर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली़ खाण्या-पिण्याचे वांदे झाले. तिथेही कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता़ त्या व्यक्तीची हतबलता पाहून तेथील पोलीस आणि नागरिकांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली़ त्यानंतर त्यांना सोलापूरचा रस्ता दाखवला़ त्या अज्ञात पोलीस आणि नागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचले अशा भावना व्यक्त करत त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले.
अंबादास विठ्ठलसा चव्हाण, असे या वाट चुकलेल्या व्यक्तीचे नाव आहे़ चव्हाण हे आकाशवाणी केंद्राशेजारील गवळी वस्ती परिसरातील रहिवासी आहेत़ अंबादास चव्हाण हे टेलर आहेत़ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत़ वडील घरी परतल्यानंतर अंबादास यांचे चिरंजीव रवी आणि धीरज यांचे अश्रू अनावर झाले़ त्यांनी भावूकपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ आमचे वडील घरी येण्याकरिता ज्या नागरिकांनी मदत केली ते सर्व देवाचे अवतार असल्याची प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केली.
शनिवारी दि़ २१ मार्च रोजी पहाटे साडेपाच ते सहा दरम्यान अंबादास नेहमीप्रमाणे वॉकिंगकरिता घराबाहेर पडले़ त्यानंतर त्यांना आपण कुठे चाललो आहोत, याची त्यांना कल्पना आली नाही़ ते थेट विजापूर रस्त्यामार्गे विजापूरकडे निघाले़ वाटेत त्यांना पोलिसांनी थांबवले, ते काहीच बोलले नाहीत़ २२ मार्च रोजी ते विजापूरला पोहोचले़ त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना खायला दिले़ इकडे कशाकरिता आला आहात, असे विचारले असता अंबादास भांबावले़ त्यांना काहीच सुचेना़ सोलापूरहून आलो आहे, असेच सांगत राहिले़ तेथील पोलिसांनी आणि सुज्ञ नागरिकांनी त्यांना सोलापूरचा मार्ग दाखवत घरी जाण्याचा सल्ला दिला़ ते पुन्हा विजापूर मार्गे सोलापूरकडे जाणाºया वाहनांची मदत घेत ते सैफुलपर्यंत पोहोचले़ तेरामैल आणि सोरेगाव परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत केल्याची माहिती चव्हाण कुटुंबीयांनी लोकमतला दिली़ सैफुल येथील काही नागरिकांनी अंबादास यांच्या घरी फोन करून याबाबत माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी अंबादास यांचे कुटुंबीय सैफुलला जाऊन अंबादास यांना घरी घेऊन आले.
आई म्हणाली...देवानेच माझ्या मुलाला पाठवले
- अंबादास हरवल्यानंतर आई प्रेमाबाई आणि वडील विठ्ठलसा हे दोघे फारच चिंतेत होते़ बुधवारी दि़ २५ मार्च रोजी एकाकी त्यांचा मुलगा सैफुलजवळ आहे, असा निरोप मिळाला़ त्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला़ सोलापुरात कडक कर्फ्यू आहे़ अशात मुलाला घरी कसे आणायचे याची चिंता त्यांना लागून राहिली़ चव्हाण कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले़ तेथील पोलिसांना त्यांनी सारी हकिकत सांगितली़ पोलिसांनी त्यांना तुम्ही बिनधास्त जा़ गर्दी करून जाऊ नका़ वाटेतील पोलिसांनाही परिस्थिती सांगा ते तुम्हाला सोडतील, असे पोलिसांकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना घरी आणले.