'खाकी' ची माणूसकी; पोलिसांनीच बनवले पोलिसांसाठी सोलापूर अन् पंढरपुरात कोव्हिड सेंटर

By appasaheb.patil | Published: April 9, 2021 01:20 PM2021-04-09T13:20:35+5:302021-04-09T13:21:49+5:30

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची संकल्पना

The humanity of ‘khaki’; Covid Center for Police in Solapur and Pandharpur | 'खाकी' ची माणूसकी; पोलिसांनीच बनवले पोलिसांसाठी सोलापूर अन् पंढरपुरात कोव्हिड सेंटर

'खाकी' ची माणूसकी; पोलिसांनीच बनवले पोलिसांसाठी सोलापूर अन् पंढरपुरात कोव्हिड सेंटर

Next

सोलापूर : राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनाही होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा पॅटर्न राबवत सोलापूर अन् पंढरपुरात कोव्हिड केअर सेंटर उभारले आहे.

सध्या महाराष्ट्रासोबतच देशात कोरोना वाढत आहे. या परिस्थितीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस फ्रंटलाईनवर काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. बेडसाठी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये हेलपाटा मारावा लागू नये, पोलीस कर्मचाऱ्यांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकारी, अंमलदार, लिपिक कर्मचारी व त्यांचे कुटुंंबियांकरिता सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

ग्रामीण पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्याच्यावर या केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. हे सेंटर सुरु करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

या मिळणार सुविधा...

कोरोनाबाधित पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय, अक्षता हॉल येथे ३५ बेडचे व पंढरपूर येथे पोलीस कल्याण केंद्र, पंढरपूर येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी लक्षणे असलेल्या पोलिसांवर प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. दिवसातून किमान दोनवेळा डॉक्टरांकडून तपासणी होणार असून, जेवण, करमणुकीसाठी संगीताची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय याठिकाणी २४ तास रूग्णवाहिका तैनात ठेवली आहे.

पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरची पाहणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली. या पाहणीनंतर आवश्यक त्या सेवा-सुविधा पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या. शिवाय चांगल्याप्रकारे सेंटरची उभारणी केल्यामुळे संबंधित यंत्रणेचे कौतुक केले.

Web Title: The humanity of ‘khaki’; Covid Center for Police in Solapur and Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.