माणूसकी; तुळशीचा रिक्षाचालक देतोय मुंबईकरांसाठी अहोरात्र विनामूल्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:42 PM2020-04-26T15:42:11+5:302020-04-26T15:43:10+5:30
असंही सामाजिक ऋण: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा नाही
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : कोरोनाच्या महामारीनं अख्खं जग होरपळत आहे. मुंबई, पुण्याचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तुळशीच्या (ता. माढा) रिक्षाचालकाने मात्र दिवसरात्र आपल्या जीवाची परवा न करता शेकडो रुग्णांना मोफत सेवा देण्याचे व्रत अवलंबले आहे. रुपेश रेपाळ असं या देवदूत रिक्षाचालकाचं नाव आहे.
मूळचे माढा तालुक्यातील तुळशी गावचे असणारे रुपेश रेपाळ हे आपल्या उपजीविकेसाठी मुंबईत काही वर्षांपूर्वी गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे मूळचे ग्रामीण भागातील असणारे पण मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात काही कामानिमित्त स्थायिक झालेले हजारो नागरिक देश व राज्यावर कोरोनाचे संकट आले की पहिले शहर सोडून गावाकडे निघून आले आहेत. पण रेपाळ यांनी गावाकडे आपल्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून सांगितले की मी गावाकडे आलो असतो पण लॉकडाऊनमुळे मुंबईत संपूर्ण वाहने बंद असल्याने अनेक मोठ्या आजारांच्या रुग्णांना कुठंही दवाखान्यात जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत आणि त्या माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. त्यामुळे आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने मला अस्वस्थ झाले होते म्हणून मी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी असणाºया कर्मचाºयांसाठी व रुग्णांना आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचे ठरवून सेवा करीत आहे.
यामध्येही पहिल्यांदा रुपेश रेपाळ यांनाही इच्छा असूनही मुंबईत लॉकडाऊनमुळे रिक्षा रस्त्यावर चालवता येत नसल्याने त्यांना अडचण निर्माण झाली होती. मग एकदा याबाबत आरटीओ अधिकाºयांना तरी भेटून येऊ असे मनाशी ठरवून रेपाळ कल्याणच्या आरटीओच्या कार्यालयात गेले. त्यावेळी तेथील आरटीओ अधिकाºयांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपत्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस गेला. त्यामुळे विनामूल्य सेवा देणारी रिक्षा म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. पण कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षामध्ये इंधन तर भरावेच लागणार होते. त्यातच या काळात आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण झाले आहेत. पण तरीही ते संकल्पावर ठाम होते. म्हणून त्यांची ही सेवा देण्याची तळमळ बघून तेथील नगरसेवक मुकुंद पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे एका महिन्यापासून म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो व तेथूनच अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे.
लॉकडाऊन संपेपर्यंत विनामूल्य सेवा
रुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात. आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. या रुग्ण सेवेदरम्यान रस्त्यात जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे.यामध्ये जास्तीत जास्त करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात.
आदित्य ठाकरेंकडून कौतुक
रुपेश रेपाळ यांच्या या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांचे कौतुक केले आहे. यामुळे तुळशी गावचे नाव रोशन झाले आहे, त्यांचा आम्हाला गर्व आहे असे तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी व उपसरपंच डॉ. शरद मोरे यांनी यावेळी सांगितले.