कारचालकाने पळवली पावणे अकरा लाखांची रोकड
By Admin | Published: October 24, 2016 03:01 PM2016-10-24T15:01:04+5:302016-10-24T15:01:04+5:30
वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेली.
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २४ - वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेण्याचा प्रकार घडला. सराफ कट्टा ते बलिदान चौक परिसरात ही घटना घडली. जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी रविवारी पहाटे कारचालक महेंद्रसिंग रामसिंग यादव (कृषीवरवार मंडळ, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे, मूळ गाव ललितपूर, उत्तप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम. एच. १४ ई.टी. २८८९ या कारमधून फिर्यादी संदीप भोगीलाल शहा (वय ४४, रा. ८0१, वसंतवासू जोदराडे बिल्डिंग, महर्षीनगर, पुणे) हे वसुलीच्या निमित्ताने सोलापुरात आले होते. महेंद्रसिंग हा त्यांच्या कारचा चालक सोबत होता. संदीप हे सराफ बाजाराकडे आले होते. कार सराफ कट्टा ते बलिदान चौक या परिसरात पार्क केली. कारमध्ये वसुली केलेली १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड होती. त्यावर लक्ष ठेवण्यास सांगून ते वसुलीसाठी आष्टगी यांच्या दुकानात गेले. या काळात चालकाला एवढी मोठी रोकड पाहून मोह झाला आणि त्याने मालकाला सराफ कट्टय़ातच ठेवून पोबारा केला. बराच वेळ झाला तरी चालक न आल्याने शहा यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ४0८ अन्वये गुन्हा नोंदला असून, तपास सपोनि बनसोडे करीत आहेत