सांडपाण्यावरील गवतामुळे भागतेय पाच हजारपेक्षा जास्त जनावरांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:06 PM2019-07-22T13:06:30+5:302019-07-22T13:09:25+5:30
गवताचा सोलापुरी पॅटर्न; शहर, परिसरातील पशुपालकांकडून खरेदी
यशवंत सादूल
सोलापूर : नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा. पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा जनावरांच्या चाºयाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यातील कित्येक गावातून चारा छावण्या उभ्या करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सोलापूर शहर व परिसरातील जवळपास साडेचार ते पाच हजार जनावरांचा चारा प्रश्न मिटला आहे. देगाव आणि रुपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या सांडपाण्यावर येणाºया पुणेरी गवताच्या सोलापुरी पॅटर्नमुळे शक्य झाले.
सोलापूर शहरातून मंगळवेढ्याकडे जाणाºया रस्त्यावर दुतर्फा दिसणारी हिरवीगार शेती पाहिल्यावर कोकणातील भातशेती वाटते. तसेच दृश्य तुळजापूर रस्त्यावर रुपाभवानी मंदिर परिसरात दिसून येते. हा सगळा परिसर शहरातील नाल्यातून आलेल्या सांडपाण्यावर उगविलेली गवत शेती आहे. देगाव परिसरात अशा प्रकारची २५० ते ३०० एकर शेती आहे. शहरातील गवळी बांधवांसह हिरज, देगाव, डोणगाव आदी परिसरातील शेतकरी येथून मोठ्या प्रमाणात हा हिरवा चारा आपल्या जनावरांसाठी घेऊन जातात.
तुळजापूर रोडवर १५० एकर परिसरात ही गवतशेती आहे. शहरातील अशोक चौक, मार्कंडेय उद्यान परिसरातून येणाºया नाल्यातून हे सांडपाणी तुळजापूर रोडवरील ओढ्यात जाते. त्याच ठिकाणी अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’ येथून सांडपाणी वाहून येते. हे वाया जाणारे घाण पाणी वापरून ही शेती केली जात आहे. त्यासाठी नाममात्र पाणीपट्टी मनपा आकारते. शहरातील गवळी बांधव आपल्या गायी, म्हशीसाठी येथील चारा मोठ्या प्रमाणात उपयोगात आणतात. यासोबत हिप्परगा, एकरुख, उळे, हगलूर, बाळे, भोगाव, तामलवाडी आदी ग्रामीण भागातील शेतकरी जनावरांना वैरण म्हणून हे गवत घेऊन जातात.
पुण्यात रुजले म्हणून पुणेरी गवत !
- पुण्यामध्ये सांडपाण्यावर या प्रकारचे गवत मोठ्या प्रमाणावर वाढते. या गवताचा चाºयासाठी उपयोग होऊ शकतो, हे ध्यानात आल्यानंतर सोलापुरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या गवत शेतीसाठी कोणत्याही प्रकारची मशागत गरजेची नाही. गवताचे रोपटे एकदा लावले की वर्षानुवर्षे गवत उगवत जाते. नाल्यातील घाणपाणी गुरुत्वाकर्षणाने व काही ठिकाणी विद्युत मोटारीने उपसा करून शेतात सोडले जाते.
वीज बिल नाममात्र पाणीपट्टी याशिवाय कोणताही अतिरिक्त खर्च नाही. दहा दिवसाला एकदा पाणी देण्यात येते. एका महिन्यात अडीच फूट गवत येते. एका एकरातील गवत २० ते २५ जनावरांना महिनाभर पुरेल इतके असते. जनावरांना दिवसभरात जितके खाद्य दिले जाते. त्यातील ६० टक्के खाद्य म्हणजे हे पुणेरी गवत. त्यासोबत कडबा, मकवान, कडवळ तीस टक्के देतात. तर काही गोपालक शंभर टक्के पुणेरी गवतच देतात.त्यामुळे दुधावर कोणताही परिणाम होत नाही असे देगाव येथील शेतकरी बिरप्पा व्हनमाने यांनी सांगितले.