वन्यप्राण्यांची शिकार करणाºया चौघांना सोलापूरात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:48 PM2018-06-12T12:48:34+5:302018-06-12T12:48:34+5:30
सोलापूर : ससे, काळविटांच्या शिकारीसाठी जाळे, धारदार शस्त्र घेऊन निघालेल्या चौघा संशयित शिकाºयांना वनविभाग व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल, रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही कारवाई करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून कुत्र्यांच्या मदतीने वन्यजीवांना हुसकावून त्यांच्या शिकाराचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या. त्यामुळे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी स्वत:चे वाहन नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना गस्तीसाठी दिले. रानवेध निसर्ग मंडळ व नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या पथकाने मंद्रुप, माळकवठे, निंबर्गी, कुरघोट, वांगी शिवारात वनविभागाच्या पथकाने गस्त घातली. मंद्रुपमध्ये शिकारासाठी काही जण जाळे घेऊन निघाल्याची माहिती खबºयामार्फत समजली. वनविभागाच्या पथकाने त्यांना बसस्थानक परिसरात ताब्यात घेतले.
शिवानंद सिद्धप्पा धाणे (वय २८, रा. रेवतगाव, ता. इंडी, कर्नाटक), जक्कप्पा धरेप्पा खांडेकर (वय ३२, रा. कर्जाळ, ता. मंगळवेढा), महांतेश पांडुरंग धाणे (वय २५, रा. रेवतगाव, ता. इंडी), चंद्रकांत मलकारी माळी (वय २४, रा. कर्जाळ, मंगळवेढा) अशी वनविभागाने पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, आठ दिवस दररोज वनविभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे व पुन्हा गुन्हा न करण्याचे हमीपत्र देण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक संजय माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, वनपाल शीला बडे, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, तरुण जोशी यांच्या पथकाने केली. रानवेध निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी मदत केली.
यत्नाळ, वळसंग शिवारात जप्त केले जाळे
- अक्कलकोट रस्त्यावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ, वळसंग शिवारात ससे, तितर पक्षी पकडण्यासाठी लावलेले जाळे नेचर कॉॅन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी जप्त केले. शिवानंद हिरेमठ, अमोल मिस्कीन यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात कुंभारी शिवारात सशांची शिकार करणाºया चौघांना पकडण्यात आले होते.
मंद्रुप शिवारात गस्त आणखी वाढणार
- मंद्रुप व परिसरात शिकाराचे प्रकार सर्रास घडतात. कर्नाटकातून काही लोक शिकारीसाठी या परिसरात येत असल्याने गस्त पथक वाढविण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले. शिकारीच्या दुर्घटना घडत असल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले.