पत्नीला आणायला गेलेल्या पतीला सासुरवाडीत चोप; चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:03 IST2025-04-03T17:03:27+5:302025-04-03T17:03:40+5:30
सासुरवाडीतील एकाने काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जखमी जावयाने खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

पत्नीला आणायला गेलेल्या पतीला सासुरवाडीत चोप; चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर : पत्नीला नांदवण्यासाठी आणायला गेलेल्या पतीस सासुरवाडीत लोखंडी रॉडने, काठीने मारहाण करून जखमी केले. याचवेळी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना पाथरी (ता. उ. सोलापूर) येथे मंगळवारी घडली.
याप्रकरणी विशाल राजेंद्र वाघमोडे (वय २२, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळू केरपा गावडे (वय ३०), नागू बाळू गावडे (वय ३२), उदय भांगे (वय ३५), राणी बाळू गावडे (वय ३७) या चौघांविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाथरी येथे फिर्यादी हे पत्नीला नांदण्यासाठी का पाठवत नाही, असे विचारण्यास गेले असता चौघांनी एकत्रित येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी सासऱ्याने लोखंडी टॉमीने डोक्यात मारून जखमी केले. यावेळी एकाने काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जखमी फिर्यादीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. या घटनेत अद्याप कोणासही अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बनसोडे हे करत आहेत.