नवरा शेतकरी, बायको बनली पोलीस अधिकारी; क्रांती पवार MPSC परीक्षा उत्तीर्ण
By प्रताप राठोड | Published: July 6, 2023 02:39 PM2023-07-06T14:39:23+5:302023-07-06T14:40:59+5:30
हवालदार बनली फौजदार : क्रांती पवारने पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
सोलापूर : तसं नोकरी करून अभ्यास करणे अवघड. पण त्यातूनही वेळ देऊन अभ्यास केल्यानंतर फर्स्ट ॲण्ड लास्ट चान्स असा विचार करून तयारी केली. आता नाही तर परत नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधून अभ्यास केला. अखेर निकाल आला आणि फौजदार बनल्याचा आनंद झाल्याची भावना क्रांती मारुती पवार-जाधव यांनी व्यक्त केली. लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालामध्ये पवार यांनी महिलांमध्ये राज्यात २८ तर एकूणमध्ये ३८३ वा क्रमांक मिळवला.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये हवालदार पदावर राहून नोकरी करत अभ्यास करून क्रांती पवार यांनी हे यश मिळवलं आहे. बारावीनंतर त्यांनी एम. ए. डी.एड. पूर्ण केले. २०१६ साली सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये शिपाई म्हणून नोकरी लागली. धुळे येथे पोलिस प्रशिक्षण घेतले. यानंतर महामारीचा संकटाचा काळ सुरू झाला. दरम्यानच्या काळामध्ये कुटुंबीयांकडून अधिकारी पदाच्या परीक्षा देण्यासाठी आग्रह देत प्रोत्साहन दिले जात होते. यामुळे कोविड काळात घरी असताना अभ्यास सुरू केला. घरापासून लांब राहण्याची वेळदेखील आली. पण अभ्यासाची चिकाटी सोडली नाही. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिस अधिकारी होण्याची संधी मिळाल्याची भावनादेखील क्रांती पवार यांनी व्यक्त केल्या.
शेतकरी पती सांगायचे अभ्यास कर...
पती शेती करतात. पण त्यांनी सातत्याने एमपीएससीचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला. शिवाय यासाठी प्रोत्साहनही दिले. शिवाय सासू- सासरे, आई- बहीण भाऊ यांनी देखील साथ दिली. मुलगा लहान असल्यामुळे चिंता असायची. पण कुटुंबीयांनी त्याचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळ केल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देता आल्याचेदेखील पवार म्हणाल्या. विशेष म्हणजे पवार यांनी राज्यसेवा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या असून पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा दिल्या असून त्याचा निकाल अद्याप बाकी आहे.
अभ्यासासाठी ड्यूटी बदलून घेत होत्या..
अभ्यासासाठी वेळ मिळावा, म्हणून त्यांनी गार्ड ड्यूटी मागितली होती. यामुळे २४ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास सुट्टी मिळायची. यातून मिळालेल्या वेळेत अभ्यास करत होत्या. वेळेचे नियोजन, सातत्य, रिव्हिजन तसेच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश नक्कीच मिळेल, असा संदेशही त्यांनी नवउमेदवारांना दिला आहे.