पत्नी देवाघरी गेली हे पतीला कळालेच नाही; तो दोन दिवस मृत पत्नीशी करत होता संवाद...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:30 AM2020-04-19T11:30:07+5:302020-04-19T12:14:08+5:30
कोरोना संकट : मुलगा अंत्ययात्रेलाही पोहचू शकला नाही...
रुपेश हेळवे
सोलापूर : जुळे सोलापूरात एक वयोवृध्द जोडपे राहत होते. पत्नीही गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती, तर पतीचे वय ही जवळपास ७८ वर्षे होते. त्यांना दोन मुले आहेत. ते दोन्ही मुले हे लॉकडाऊनमुळे सोलापूरच्या बाहेर अडकले होते. दरम्यान, दोन दिवसापुर्वी पत्नीचा जीव गेला, पण हे वयोवृध्द पतीला कळालेच नाही. तो आपल्या पत्नीकडे जाऊन म्हणत होता तुला बरं वाटत नसेल तर तु झोप, आराम कर... जेव्हा परिसरात दुर्गंधी पसरली तेव्हा शेजाºयांनी पोलीसांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, पण लॉकडाऊनमुळे अडकलेला एक मुलगा आईच्या अंत्ययात्रेलाही येऊ शकला नाही.
जुळे सोलापूरात एक ६३ वर्षाची महिला आणि ७८ वर्षाचे पुरूष असे जोडपे राहत होते, महिला ही गेल्या अनेक दिवसापासून आजारी होती, तर पतीचे वय झाल्यामुळे त्यांना दिसण्याबरोबरच ऐकण्याची, वास घेण्याची क्षमता ही कमी झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा मुंबईमध्ये वकीली व्यवसाय करतो तर दुसरा मुलगा सोलापूरात व्यवसाय करत दुसºया ठिकाणी राहत आहे.
पण दोन्ही मुले हे आपल्या आई वडीलांची नेहमी काळजी करत असत. आईवडीलांच्या सेवेसाठी एक महिला होती. बुधवार १५ एप्रिल रोजी ही घरकाम करणारी महिला पुढील दोन दिवस कामासाठी येणार नाही असे सांगून तिने सुट्टी घेतली, त्यानंतर ती महिला कामासाठी आलीच नाही, याच दरम्यान (बुधवारी सायंकाळी किंवा गुरूवारी) आजारी असलेली महिला ही बेडवरून खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पण पती हे वयोवृध्द असल्यामुळे आपली पत्नी खाली पडली. त्यात ती जखमी झाली. हे पतीला कळालेच नाही. ते पत्नीच्या रुम मध्ये गेल्यावर पत्नीला म्हणत, तुला बरं वाटतं नाहीय का , मी मुलाला सांगितले आहे. तो डॉक्टरांना पाठवून देईल. तुला लगेच बरे वाटेल़ असे म्हणून जात होते, अशी माहिती पोलीसांनी दिली, आपल्या पत्नीचा मृत्यू होऊन एक-दोन दिवस झाले आहे हे त्यांना कळलेच नाही.
पण एक-दोन दिवस झाल्यानंतर म्हणजेच गुरूवार सायंकाळपासूनच परीसरात दुर्गंधी पसरली. यामुळे परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांना परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती दिली. तेव्हा जुळे सोलापूर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रकाश पवार, कपिल जवळे, मिथुन चव्हाण हे घटनास्थळी पोहचले, आणि घरात जाऊन पाहिले असता ही घटना उजेडात आली.
तेव्हा पोलिसांनी दोन्ही मुलांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पण लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मुलांना सोलापुरात येता येईना. कसेबसे प्रयत्न करून एक मुलगा सोलापुरात दाखल झाला. दुसरा मुलगा परवानगी घेऊन दुचाकीवरून सोलापूर गाठले. पण त्याला सोलापूरला येण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीर होणार होता, यामुळे मुलाने आपल्या काळजावर दगड ठेवत आईच्या अंत्यविधी उरकण्यास आपल्या भावाला सांगितले. भावाने सांंगितल्याप्रमाणे आईचा अंत्यविधी एकाच मुलाच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री करण्यात आले. ही घटना जेव्हा परिसरात कळली तेव्हा नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.
---------------------------------
मुले दिवसातुन चार वेळा करत होते फोन.
आपले आईवडील एकटेच आहेत. यामुळे त्यांच्या काळजीसाठी मुलांनी महिला कर्मचारी नेमले होते. ती महिला दररोज येऊन काम करत होते, याच बरोबर आईवडीलांची विचार पुस करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांची ही वेळोवेळी पाठवत होते़ याच बरोबर दिवसातुन ते चार वेळा फोन करत आई वडीलांची विचारपुस करत होते़ अशी माहिती पोलीसांनी दिली.
--------------------------------
आपल्या आईचा मृत्यू झाला आहे हे मुलांना कळताच त्यांना धक्का बसला. ते कसेबसे करून सोलापूर येण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. पोलीसांची परवानगी मिळाली. पण येताना प्रत्येक ठिकाणी त्यांची विचारपुस होत होती़ सोलापुरात आल्यानंतर त्यांची कोरोना बाबतची तपासणी करण्यात आली. आणि त्यांना घरी सोडण्यात आले. सोलापूरात दाखल होईपर्यंत ४ ठिकाणी त्यांना तपासणी करण्यात आले.
-------------------------------
घडलेली घटना पोलीसांना सांगितले, त्यामुळे पोलीस प्रशासनाचा ही मदत झाली. पण सोलापूरला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे मला आईच्या अंत्यविधी मिळाली नाही. वडीलांना धक्का बसेल म्हणून अजूनही वडीलांना आई गेल्याचे सांगितले नाही.
मयताचा मुलगा