पती गेले.. आधार गेला..तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:00 PM2020-09-10T12:00:41+5:302020-09-10T12:01:33+5:30
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष; देवगावच्या सुरेखा पाटील म्हणतात.. मुलांना खूप शिकवायचंय
बार्शी: शेतात चार पैसे मिळावेत म्हणून खासगी आणि सहकारी सोसायटीचं कर्ज घेतलं. पुढं निसर्गाच्या अवकृपेमुळे कर्ज फिटेना म्हणून वयाच्या ३५ व्या वर्षी शेतकरी पती उद्धव पाटील (देवगाव) यांनी १४ डिसेंबर २०१४ मध्ये आत्महत्या केली. पती गेले.. आधार गेला. दोन कच्चीबच्ची मुलं. सरकारकडं मदत मागितली, पण मिळाली नाही. तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय. पतीनं निराश होऊन आत्महत्या केली, पण मुलांना कणखर बनवेन. त्यांना खूप मोठं झालेलं बघायचंय, असा आशावादी दृष्टिकोन सुरेखा पाटील यांनी व्यक्त केला.
कै .उद्धव पाटील यांना दोन मुले आहेत़ त्यांनी आत्महत्या केली तेव्हा ते इयत्ता तिसरी आणि चौथीला शाळेत शिकत होते़ आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याकडे सोसायटीचे नव्वद हजार रुपये कर्ज होते, ते तसेच आहे़ सरकारकडे मदत मागितली; मात्र ही शेतकरी आत्महत्या नसल्याचे सांगत शासनाने मदत केली नाही़ साडेतीन एकर जिरायती जमिनीवर स्वत: सुरेखा पाटील काम करीत आहेत़ सासºयांचेही निधन झाले. घरी वृद्ध सासू आणि दोन्ही मुलांचा सांभाळ करीत त्यांचा संघर्ष सुरू आहे.कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने थोडासा आधार मिळाला आहे़ दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च शेतातील उत्पन्नावर करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत़ मुलांना उच्चशिक्षित करून मोठे करण्याचा त्यांचा मनोदय आहे.