प्रॉपर्टीच्या वादातून पत्नी व मुलाच्या मारहाणीत पतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:06+5:302021-09-16T04:29:06+5:30
याबाबत शालन नामदेव अडसूळ (रा. दत्तनगर-टेंभुर्णी, ता. माढा) हिने १४ सप्टेंबरला पुणे येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी ...
याबाबत शालन नामदेव अडसूळ (रा. दत्तनगर-टेंभुर्णी, ता. माढा) हिने १४ सप्टेंबरला पुणे येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी पत्नी रिहाना व त्यांचा मुलगा जुनेद मुजावर (रा. मुजावर गल्ली-सांगोला) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा बंडगार्डन पोलीस स्टेशनकडून बुधवारी शून्य क्रमांकाने सांगोला पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे.
रजाक इस्माईल मुजावर यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून शालन नामदेव अडसूळ ही घरकाम करत होती. तिचे आणि रजाकचे जुळलेल्या प्रेमसंबंधाबद्दल पत्नी रिहाना व मुलगा जुनेद यांना समजले होते म्हणून त्यांनी तिला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर ती बहीण रेश्मा लोखंडे हिच्याकडे टेंभुर्णी येथे राहत होती. दरम्यानच्या काळात रज्जाक मुजावर तिच्याकडे टेंभुर्णीला ये-जा करत होता. ९ सप्टेंबरला दुपारी ३ च्या सुमारास रज्जाक मुजावर तिच्या घरी येऊन बायको रिहाना व मुलगा जुनेद या दोघांनी प्रॉपर्टी मिळविण्यासाठी ७ सप्टेंबरला राहत्या घरी काठीने मारहाण केली असून मला दवाखान्यात घेऊन चल, असे म्हणाला.
यानंतर शालन अडसूळ ही त्याला टेंभूर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेली असता त्याला बरे वाटले नाही म्हणून त्याने तिला मला पुणे येथील चांगल्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन चल असे म्हणाला. शालन अडसूळ हिने त्यास पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर उपचारादरम्यान १४ सप्टेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप करत आहेत.