अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:16 PM2020-06-23T12:16:10+5:302020-06-23T12:20:13+5:30

वीरपत्नीची संघर्ष गाथा; पानगावच्या राहीबाई पवार यांचा त्याग; पुतण्यास दत्तक घेऊन चालवले शहीद पतीचे नाव

Husband martyred before wiping turmeric on body; Only four days of happiness are the companions of life | अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

अंगावरची हळद पुसण्याआधी पती शहीद; सुखाचे चार दिवसच आयुष्याचे साथीदार

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झालापठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले

प्रसाद पाटील
पानगाव: अंगावरची हळद पुसण्याआधी देशसेवेसाठी पती शहीद झाले. सुखाच्या चार दिवसांची आठवण आयुष्यभर उराशी बाळगत पानगावच्या वीरपत्नी राहीबाई पवार यांनी त्याग केला आहे. शहीद पती अभिमन्यू पवार यांचं नाव चिरकाल टिकून राहण्यासाठी विवाह केला नाही. पुतण्यास दत्तकपुत्र करून घेऊन पतीची आठवण आयुष्यभर टिकवून ठेवली आहे. 

भारतीय कुटुंब संस्था हीच मुळी नारीच्या त्यागावर टिकून आहे आणि त्या त्यागाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पानगावच्या वीर पत्नी राहीबाई पवार... १९६५ च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेला शिपाई अभिमन्यू भीमराव पवार यांच्या पत्नी राहीबाई... परसदारात सागरगोटे खेळणारी राही... बार्शी तालुक्यातील इर्ले गावच्या कष्टाळू शेतकरी सखाराम काजळे यांची धाकटी कन्या. 

हसण्या-खेळण्याच्या वयातच राहीबाईची थोरली बहीण पानगावच्या सुखदेव पवार या ७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत सैनिकाच्या अर्धांगिनी .. थोरली बहीण रुक्मिणीनं आपल्या धाकट्या दिरासाठी ६ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत शिपाई अभिमन्यू पवार यांच्यासाठी या स्थळाचा अट्टाहास केला आणि राहीबार्इंचा विवाह ठरला... अभिमन्यू वयाच्या १८ व्या वर्षी भावाच्या पावलावर पाऊल ठेवून १९६१ मध्ये देशसेवेत रुजू झाले. विवाह जमला. ३ सप्टेंबर १९६५ ला लग्नाची तारीख ठरली. एक महिन्याच्या सुट्टीवर अभिमन्यू गावाकडे आला. 

लग्नाची धामधूम. पाच दिवसांत हळदी-देवकार्य पार पडलं... लग्नाचा दिवस उजाडला राही बोहल्यावर चढली... शुभमंगल सावधान... पार पडलं... उपवरही न झालेल्या वधूच्या मनाचा अल्लडपणाही कमी झाला नव्हता... लाजणे, लपणे तर सोडाच खेळकरपणाच अद्याप गेला नव्हता... लग्नाच्या पाचव्या दिवशी तार आली.. ताबडतोब निघा... भारत-पाक युद्ध भडकलं होतं... हळदीच्या अंगानंच अभिमन्यू कर्तव्यावर निघाला... चिमुकली राही मात्र चाललेल्या घडामोडींपासून अनभिज्ञ होती.

 तेथे पोहोचताच पुंछ सेक्टरमधील मोर्चावर नियुक्ती झाली. पाकिस्तानच्या सैनिकांना मागे हुसकावत ६ मराठा लाईट इन्फंट्री कूच करत होती आणि १३ सप्टेंबर १९६५ रोजी पहाटे घात झाला. पठारी प्रदेशात मागून पाकड्यांचा हल्ला झाला... अभिमन्यूसह १८ जवान शहीद झाले. 

भारतीय संस्कृती व कुटुंबव्यवस्थेला साजेसा त्याग करणाºया राहीबाई आपल्या जीवनाचा उत्तरार्ध आपला दत्तकपुत्र पुतण्या प्रकाश पवार याच्या आश्रयाने व्यतीत करत आहेत.

अन् कपाळाचं कुंकू पुसलं
इकडे नवºयाच्या परतण्याची वाट बघणाºया पवार कुटुंबाच्या हाती मात्र भारत-पाक युद्धात अभिमन्यू शहीद झाल्याची तार मिळाली. जेवणावळीचा गंध अजून दरवळत होता... सगेसोयºयांची वर्दळ अजून कमी व्हायची होती. जाणत्या माणसांना समजलं... राहीबाई मात्र अनभिज्ञ... हातावरची मेहंदी काळवंडली होती... वºहाडीकºयांच्या बैलगाडीची घुंगरं मुकी झाली होती... अंगाची हळद पुसण्याआधीच कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं.

वीरपत्नी सन्मानाचं जगणं
राहीबाईला काहीच समजत नव्हतं.. पण त्या नासमज वयातही राहीने वीरपत्नी म्हणून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. लग्नातील प्रसंग आठवला तरच पतीचा चेहरा आठवतो... आणि याच पुसट आठवणीच्या आधारे जगत, पुनर्विवाह न करता वीरपत्नी म्हणून सन्मानानं जीवन व्यतीत करणाºया राहीबाई आज अनेक व्याधीग्रस्त आहेत.

शहीद पत्नीच्या आठवणीसाठी
राहीबार्इंनं केलेल्या त्यागापोटी त्यांना पेन्शनसाठी, अनेक हक्कासाठी झगडावं लागलं. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या... न आठवणाºया आपल्या शहीद पतीचं नाव पुढं सुरू रहावं म्हणून सोलापूर पोलीस दलात कार्यरत आपला पुतण्या प्रकाश पवार याला त्यांनी दत्तक घेतलं.  आणि शहीद अभिमन्यू पवार यांचा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आजच्या युगात राहीबाई पवार यांचा सारखा त्याग करणारी व्यक्ती विरळच म्हणावी लागेल. अवघं आयुष्य त्या त्यागी वृत्तीने जगत आहेत.

Web Title: Husband martyred before wiping turmeric on body; Only four days of happiness are the companions of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.