हुश्श...पाऊस थांबला; मतदान केंद्रावर लागल्या रांगा
By appasaheb.patil | Published: October 21, 2019 11:12 AM2019-10-21T11:12:05+5:302019-10-21T11:14:13+5:30
दिव्यांग मतदारांसाठी खास पथके; सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा पुढाकार
सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात मतदानाला सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली मात्र पावसामुळे पहिल्या दोन फक्त ३़५७ टक्केच मतदान नोंदविले गेले. आता पाऊस थांबला असून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसू लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात रात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता़ सकाळीही पावसाची संततधार सुरूच होती़ सात वाजता मतदानाला सुरूवात झाली त्यावेळी मोजकेच लोक छत्री, रेनकोटच्या आधाराने मतदान केंद्र गाठले. त्यामुळे पहिल्या दोन तासात कमी मतदान झाल्याचे सर्वच केंद्रावर दिसून आले़ सकाळी नऊनंतर पावसाची संततधार थांबल्याने लोक घराबाहेर पडू लागले आहेत.
सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील बहुतांश केंद्रावर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या़ मात्र रात्रभर झालेल्या पावसाने मतदान केंद्रासमोर पाणी साठल्याचे चित्र दिसून आले़ या पाण्यातून वाट काढीत मतदारांनी मतदान केले़ शहरातील बहुतांश मतदान केंद्रात अद्यापही पाणीच पाणी असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे खास पथके नेमण्यात आली असून सर्वांना घरोघरी मतदार स्लिपा पोहच करण्यात आले आहेत़ ज्या दिव्यांगानी वाहनांची मागणी केली आहे त्यांना आज घरपोच सेवा दिली जाणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ़ भिमाशंकर जमादार यांनी दिली.
-----------------------
- सोलापूर जिल्हयातील मतदार संघ निहाय सकाळी 9 वाजे पर्यंत ची मतदानाची टक्केवारी
- करमाळा- 6.85%
- माढा- 3.4%
- बार्शी- 2.93%
- मोहोळ- 2.39%
- सोलापूर शहर उत्तर-2 %
- सोलापूर शहर मध्य 2.69%
- अक्कलकोट- 3%
- सोलापूर उत्तर- 1.15%
- पंढरपूर 3.19%
- सांगोला- 5.9%
- माळशिरस- 3.96%