हौसेनं पोपटाला दाखवू नका पिंजरा; तुरुंगाच्या हवेचा बसेल मग हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 07:25 PM2022-05-31T19:25:22+5:302022-05-31T19:25:28+5:30
२५ हजार दंड होऊ शकतो : घटत्या संख्येमुळे आरक्षित यादीत समावेश
सोलापूर : मिटू मिटू बोलणारा पोपट बुद्धिमान पक्षी पाळण्याचा मोह अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही. पण आता असं काही करु नका. नाहीतर आपल्या हौसेखातर त्याच्यासाठी आणलेला पिंजरा सोडून तुम्हालाच बिनभाड्याच्या तुरुंगातील पिंजऱ्यात बंदिस्त व्हायची वेळ येईल. अलीकडे पोपटांची संख्या घटू लागल्याने वन्यजीव कायद्यानुसार त्याची आरक्षित ४ यादीमध्ये गणना झाली आहे. जो गुन्हा ठरु शकतो.
वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र पोपटांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. अलीकडे ही संख्या घटली आहे. यामुळे या प्रजातीचं संवर्धन करण्यासाठी वन्यजीव कायद्यानुसार पोपट पाळणे, त्याचे पंख छाटणे, विकणे, विकत घेणे हा गुन्हा मानला जात आहे. असे प्रकार आढळले तर २५ हजारांच्यावर दंडात्मक कारवाई अथवा दोन वर्षे कारावास अशी शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद आहे.
पोपट शाकाहारी पक्षी आहे. दूध, बियाणे, पेरू, मिरची, आंबा हे त्याचे खाद्य. पोपटाची चोच वरच्या भागात वाकलेली असते आणि लाल असते. महत्त्वाचे म्हणजे पोपटाचे डोळे अतिशय तेजस्वी आणि काळ्या रंगाचे असतात.
पोपट हे जगभरात रंगीबेरंगी स्वरुपात आढळतात. महाराष्ट्रात हिरव्या आणि लाल चोचीचा पोपट आढळतो. अधूनमधून गुलाबी रंगांचा नर त्याच्या गळ्याभोवती काळ्या रंगाची रिंग आढळते. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळणाऱ्या पोपटांना न्यू वर्ल्ड पोपट म्हणतात, तर आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जुने पोपट आहेत. आज जगात पोपटांच्या तीनशेहून अधिक प्रजाती आहेत.
---
पाच वर्षांच्या मुलाएवढी बुद्धिमत्ता
पोपट हा एक बुद्धिमान पक्षी आहे. ज्याला तुम्ही बोलून शिकवूदेखील शकता. असे म्हटले जाऊ शकते की, त्याच्याकडे ५ वर्षांच्या मुलाइतकीच बुद्धिमत्ता आहे. पोपट रंग आणि आकार ओळखायला शिकतो. तो अनुकरणशील आहे. पोपट प्रजातींचा रंग निळा, पांढरा, पिवळा किंवा रंगीत असतो.
----
एकाचवेळी हजार किलोमीटर उडू शकतो
पोपटाची चोच खूप मजबूत असते. चोच मोडल्यानंतरही वाढते. कारण ती केराटिन प्रथिनेपासून बनलेली असते. हे मुख्यतः उष्ण ठिकाणी आढळतात. पोपटांना कळपात राहायला आवडते. त्याचा पंजा खूप मजबूत असतो. विशेष म्हणजे तो एकाचवेळी १ हजार किलोमीटर उडू शकतो. त्याचे वजन ५०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत असते आणि आयुष्य १५ ते २० वर्षे असते. पण ८२ वर्षे जगण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुकी नावाच्या पोपटाच्या नावे आहे.
----