त्या चिमुकल्याचा भाषणाचा हट्ट अधिकाऱ्यांनी पुरवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:43+5:302021-08-17T04:27:43+5:30

मंगळवेढा : तहसील कार्यालय.. स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाची लगबग.. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमही पार पडला. पण, एका चिमुकल्याला भाषणाची संधी मिळाली ...

Hutt officials provided the speech of that Chimukalya! | त्या चिमुकल्याचा भाषणाचा हट्ट अधिकाऱ्यांनी पुरवला !

त्या चिमुकल्याचा भाषणाचा हट्ट अधिकाऱ्यांनी पुरवला !

Next

मंगळवेढा : तहसील कार्यालय.. स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाची लगबग.. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमही पार पडला. पण, एका चिमुकल्याला भाषणाची संधी मिळाली नाही म्हणून तो हिरमुसला. मग काय त्याच्या हट्टासाठी चक्क प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसीलदारांनी त्याला संधी दिली. चिमुकल्यानं जोषपूर्ण भाषण केलं त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. बालमन जपणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेनं त्याच्या आईच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहिले.

मंगळवेढा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मंगळवेढा येथील नूतन मराठी विद्यालय व इंग्लिश स्कूल मधील आर्या जगताप, वेदांत गडदे, श्रद्धा शिंदे यांची भाषणे झाली. मात्र या दरम्यान संयोजकांकडून श्रीपाद श्रीधर कुलकर्णी या पाचवीतल्या विद्यार्थ्यांचे नाव चुकून राहून गेले. सर्व तयारी करूनही संधी दिली गेली नाही म्हणून त्याचे डोळे भरुन आले. कार्यक्रम संपल्याने उपस्थित अधिकारी, राजकीय पदाधिकारी, नागरिक बाहेर जाऊ लागले. या दरम्यान अविनाश शिंदे, राहुल शहा, प्रशांत मोरे यांना मुलगा मोठ्याने रडत असल्याचे दिसले. त्याच्या पालकाला रडण्याचे कारण विचारले. सर्व तयारी करून आलेल्या त्या विद्यार्थ्यांला भाषणाला संधी मिळाली नाही यामुळे तो रडत असल्याचे आई गौरी कुलकर्णी व शिक्षिका उज्ज्वला घोडके यांनी सांगितले.

ही बाब प्रांताधिकाऱ्यांना समजताच त्यांनी त्या मुलाला तहसीलदाराच्या केबिनला बोलावून घेतले. त्याला समजावत आपल्या खुर्चीजवळ उभे करीत भाषण करण्यास सांगितले. त्यानेही मोठ्या जोशात भाषण केले उपस्थितांनीही टाळ्या वाजवून कौतुक केले. मुलाचा हट्ट पूर्ण झाल्याने व त्याचे होणारे कौतुक पाहून आई गौरी कुलकर्णी यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. या चिमुकल्याचे भाषण ऐकून माझे बालपण मला आठवल्याचे डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यासह नायब तहसीलदार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

----

आपल्याला भाषणाची संधी मिळाली याचा मनोमन आनंद श्रीपादच्या चेहऱ्यावर दिसून आला. प्रांताधिकाऱ्यांनी त्याला डिक्शनरी व गुलाबपुष्प देऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आमच्या विद्यालयातील बालकांचे बालमन जपण्यासाठी मंगळवेढा येथील प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसीलदारांनी जी संवेदनशीलता दाखवली ती कौतुकास्पद व आदर्शवत असल्याचे मुख्याध्यापिका सुनीता औताडे यांनी सांगितले.

---

फोटो ओळी-- चिमुकल्याचा सन्मान करताना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, डीवायएसपी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्निल रावडे.

Web Title: Hutt officials provided the speech of that Chimukalya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.