बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार; १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 13, 2024 20:06 IST2024-05-13T19:11:06+5:302024-05-13T20:06:06+5:30
खंडाळीजवळ अपघात : १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल

बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार; १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल
सोलापूर: मुंबईहून हैदराबादकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगात निघालेली आराम बस एका ट्रकवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तसेच या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर ११ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवार, १३ मे रोजी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ झाला. या बाबत प्रवासी हाशमी सयद आसेमअल्ली (वय २६, रा. टोलीचौकी, हैद्राबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथून हैद्राबादकडे निघालेली आराम बस (एम.पी. ०९ / डी. एल. ८०९१) ही १३ मे रोजी पहाटे २:३०च्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ आली असता समोर चाललेल्या ट्रक (एम.एच.१२ / एस.एफ. ५२७२) ला पाठीमागून जोरात धडक दिली.
या अपघातात जाबीर अन्सारी (वय ३२, रा. हैद्राबाद) हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला तर नेहा विजयकुमार (वय २७), सुहासिनी नकुलचंद भिस्वाल (वय २७, रा. हैद्राबाद), पूजा भास्कर अंजनकर (वय २५, रा. देवगाव, जि. बुलढाणा), फिज फतीमा अबुल कासीम शेख (वय ३२, रा. मुंबई) हे गंभीर जखमी झाले तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.