हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लूने सोलापुरातील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:27 AM2020-05-21T11:27:30+5:302020-05-21T11:30:13+5:30
‘आलं अन् तुळशी’चा दिला जातो काढा; आयसोलेशनमध्ये टीव्हीसोबत पुस्तकांचीही सुविधा
सोलापूर : कोरोना आजारावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी त्यावर उपचार करणे शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णांना सकस आहार व रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी औषधे देण्यात येतात. यामुळे या आजारावर उपचार करणे शक्य होते.
गंभीर व सौम्य लक्षणे यानुसार रुग्णांमध्ये विभागणी करण्यात येते. ज्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो त्याला आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये अॅडमिट केले जाते, तर इतर रुग्णांना सामान्य वॉर्डामध्ये (आयसोलेशन वॉर्ड) अॅडमिट केले जाते. या सामान्य वॉर्डामध्ये आॅक्सिजन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लू ही औषधे दिली जातात. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून विटॅमिन सी, विटॅमिन बी १२ ची औषधे दिली जातात. यासोबत प्रथिनेयुक्त सकस आहार (हायप्रोटिन डायट) यात अंडी, दूध, पोळी-भाजी, वरण, भात, चिक्की यांचा समावेश असतो.
रुग्णांचे मन लागावे म्हणावे टीव्हीची सोय करण्यात आली आहे. आयसीएमआर (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) यांच्या नव्या नियमाप्रमाणे रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून सात ते दहाव्या दिवशी त्याला ताप व इतर लक्षणे नसल्यास त्याला दहाव्या दिवशी घरी सोडले जाते.
ज्या रुग्णामध्ये लक्षणे आहेत त्यांचा १४ व्या दिवशी पुन्हा एकदा दोनवेळा स्वॅब घेऊन तो निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जाते. दोनदा स्वॅबची चाचणी केली जाते. यात रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येते.
रुग्णांना मोबाईल वापरण्यास मुभा दिली जाते. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहू शकतात. रुग्णालयात काम करणाºया काही कर्मचाºयांनाही वाईट अनुभव आला. त्यामुळे अशा कर्मचाºयांच्या राहण्याची सोय रुग्णालय व्यवस्थापनाने केली आहे.
..असा असतो रुग्णांचा दिनक्रम
- सकाळी आंघोळीनंतर ७:३० वाजता चहा दिला जातो. ८:३० वाजता नाष्टा तर ११ वाजता काढा दिला जातो. एक दिवस तुळशीच्या पानांचा तर एक दिवस आल्याचा असा आलटून-पालटून काढा दिला जातो. दुपारी १२.३० ते एकच्या दरम्यान जेवण दिले जाते. सायंकाळी पाच वाजता चहा व बिस्कीट दिले जातात. रात्री ८ ते ८.३० दरम्यान जेवण दिले जाते. सकाळी नाष्टा तर रात्री जेवणानंतर औषधे दिली जातात. अतिदक्षता विभागात असणाºया (श्वास घेण्यास त्रास असणाºया) रुग्णांना दिवसातून तीन वेळा इंजेक्शन दिले जाते. रुग्ण हे त्याच्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचतात व टीव्ही देखील पाहतात.
रुग्ण बरा होऊन घरी गेल्यास त्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक द्यायला हवी. पुढील सात दिवस त्याने काळजी घ्यावी. कोरोना आजारातून बाहेर पडलेला रुग्ण आता सामान्य झालेला असतो. त्यानेही इतरांप्रमाणे मास्क वापरायला हवे. तसेच इतरांपासून साडेतीन फूट अंतर राखायला हवे.
- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक,
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय