‘मुझे डर सिर्फ अल्लाह से लगता है... कोरोना तो एक बहाना है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:33 AM2020-06-02T11:33:23+5:302020-06-02T11:36:50+5:30
निराधारांनाही अंतिम निरोप देण्याची सेवा; मृताच्या धर्मानुसार करतोय अंत्यसंस्कार
सोलापूर : ज्याला कोरोना झाल्याचे कळताच आप्तस्वकीय, नातेवाईकही दूर पळतात... तिथे लादेन नामक व्यक्ती हा कोरोनामुळे मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करतोय. तेही मृत व्यक्तीच्या जाती-धर्मानुसार. कोरोनाची भीती इतकी आहे की मृत्यू झाल्यानंतर देखील प्रेताजवळ कोणी जात नाही. नातेवाईकही पाठ फिरवतात. लांबूनच अंतिम दर्शन घेतात; मात्र लादेन घरचाच सदस्य समजून मरण पावलेल्या व्यक्तीला शेवटचा निरोप देऊन पुन्हा पुढच्या कार्याला लागतो. ते म्हणतात, ‘मुझे अल्लाह से डर लगता आहे.. कोरोना तो एक बहाना आहे’.
जहाँगीर अब्दुल रजाक शेख उर्फ लादेन. बैतुल महल शिपा कमिटीचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून २००६ पासून ते बेघर, निराधार असलेल्यांवर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्याकडे दोन शववाहिका आहेत. जय हिंद नावाने ते शववाहिका चालवतात. या कामात मुलगा नासीर हाही मदत करतो. तो टेलर आहे. आतापर्यंत त्यांनी नऊ हजारांहून अधिक बेघर लोकांवर अंतिम संस्कार केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन महानगरपालिकेने त्यांना कोरोनातून मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी ती जबाबदारी निस्वार्थपणे तीही काही क्षणात स्वीकारली.
त्यांच्या निस्वार्थपणाची दखल घेऊन महानगरपालिकेने त्यांना मानधन देण्याची तयारीही दर्शवली. त्या मानधनाकडे लादेन दुर्लक्ष करतात. त्याकरिता त्यांचा कोणताही अट्टाहास नाही. मेलेल्यावर अंत्यसंस्कार करणे म्हणजे अल्लाहची सेवा आहे आणि ती केलीच पाहिजे असे लादेन सांगतात. तुम्हाला कोरोनाची भीती वाटत नाही का ? असे लादेन यांना विचारले असता ते म्हणतात, ‘कोरोना निमित्त आहे. सर्वजण अल्लाह- ईश्वर यांच्यापासून भीती बाळगली पाहिजे’. आपलं कर्मच आपली ओळख बनवते, ना कोणता धर्म ना कोणती जात. काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या कामातून प्रेरणा घेऊन समाजातील बेघर आणि कोरोनातून मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करत असल्याची प्रांजळ कबुली देखील ते देतात.
हॅलोऽऽ, जय हिंद.. बोला...
लादेन यांना तुम्ही कधीही फोन करा, ते फोन रिसिव्ह करताच हॅलोऽऽ, जय हिंद.. बोला असे देशाभिमानीवृत्तीने, आपुलकीने संवाद साधतात. शहरातील सर्वच स्मशानभूमीत सध्या भयाण शांतता आहे. अंत्यसंस्काराला मोजक्याच लोकांना परवानगी असल्याने स्मशानभूमीत कोणी फिरकेना. कोरोनातून मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार होताना मयताच्या परिवारातील फक्त दोघांनाच स्मशानभूमीत उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे घरातील मंडळी, नातेवाईक प्रेताजवळ येत नाहीत. खूपच लांब राहून अंत्यविधी पाहत असतात. अशावेळी लादेनच शवाच्या जवळ राहून अंतिम विधी पार पाडतात.
कोरोनाला घाबरू नका. घरी राहूनच स्वत:ची काळजी घ्या. कोरोना झाल्यानंतरही तुम्ही बरे होऊ शकता. त्यामुळे मनात कोणतीही भीती बाळगू नका. माझ्या घरात एकूण दहा माणसं आहेत. सर्व अंत्यविधी पार पडल्यानंतर आवश्यक ती सुरक्षेची काळजी घेतो. स्वत:ला सॅनिटायझर करून घेतो. आंघोळ करतो. घरातही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतो.
-जहाँगीर अब्दुल रजाक शेख उर्फ लादेन
संस्थापक अध्यक्ष : बैतुल महल शिफा कमिटी.