राग येतोय, काय करायला हवं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:04 PM2019-04-25T14:04:26+5:302019-04-25T14:04:56+5:30

रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो.

I am angry, what should I do? | राग येतोय, काय करायला हवं ?

राग येतोय, काय करायला हवं ?

googlenewsNext

बºयाचदा ‘मी फार रागीट आहे!’ ‘मला फार लवकर राग येतो, त्या परिस्थितीत मी रागवायचं नव्हतं तर काय करायचं होतं?’ ‘मी रागवू नको तर काय करू?. रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’ यासारखी वाक्यं बोलून प्रत्येक जण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानिकारक आहे, हे एखाद्या वेळेस माहीत असूनसुद्धा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही. रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो. ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत.

प्रथमत: माणसाला राग का येतो?. त्या मागची कारणीमीमांसा जर आपण नीट समजून घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जाऊ शकेल. माणसाला राग पुढील काही कारणांमुळे येतो. एकतर माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो. दुसरे आपण इतर लोकांबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहिजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहिजे?. पण प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रतिमेशी मेळ घालत नाही.

जेव्हा असे घडते तेव्हा आपण अस्वस्थ होतो व आपणास राग येतो आणि तिसरे म्हणजे आपल्या संबंधित असलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या इच्छेनुसार वागत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो. याशिवाय मागील काही अप्रिय घटनांबद्दल आपल्या मनात चाललेलं द्वंद्व, इतरांना बदलण्यासाठी चाललेल्या प्रयत्नात जेव्हा अपयश येते तेव्हा आपल्याला राग येतो. इतरांना खूश करण्यासाठी एखादी गोष्ट आपण आपल्या मनाविरुद्ध करतो तेव्हा देखील आपल्याला राग येतो.

आपण राग येण्याची कारणे बघितली. आता याचे व्यवस्थापन कसे करावयाचे व रागापासून स्वत:ची कशी सुटका करून घ्यावयाची हे पाहूया. सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करायला हवे की, मला राग येतो व ही एक घातक सवय आहे. राग हा एक नकारात्मक विचार आहे की, जो आपली मन:शांती भंग करतो व आपल्या आरोग्यास तो अपायकारक आहे. हे मान्य केल्याशिवाय आपल्याला त्यापासून सुटका करून घेता येणार नाही. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा हे तपासले पाहिजे की राग कोणाला येतोय? त्यामुळे कोणाचे नुकसान होत आहे? जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोणाला द्यावी लागणार आहे? याचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्याचे उत्तर येईल,‘आपण स्वत:! किती वेळा आपण स्वत:चे नुकसान करून घेणार आहोत? राग ही एक चुकीची सवय आहे व ती प्रयत्न केल्याने बदलता येते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राग न येण्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जसं की इतरांनी वेळेवर यावे, मला फोन करावा, माझ्याशी प्रेमानेच वागावे, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात इ. काही घटनांमध्ये आपण म्हणतो, माझ्याकडे रागावण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे राग हा एक नकारात्मक विचार आहे व तो करावयाचा की नाही, हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. राग हा माझ्या शरीराला हानिकारक आहे तरी मी तो करतोय म्हणजेच मीच माझ्या शरीराची हानी करून घेतोय. हे चुकीचे आहे, हे एकदा लक्षात आले की, आपण रागावणे सोडून देऊ.
आपण रागाला स्वाभाविक किंवा नैसर्गिक समजतो. जे की चुकीचे आहे. आपण या जगात इतरांना कायम खूश ठेवण्यासाठी आलेलो नाहीत, हे लक्षात घ्या. या बाबी लक्षात घेतल्यानंतर मला खात्री आहे की, आपण राग करत असाल तर ते करणे सोडून द्याल. जीवनात शांती व आनंद प्रस्थापित कराल, तर मग चला राग करणे सोडूया, आनंद देऊया व आनंद घेऊया.
- महेश भा. रायखेलकर
(लेखक हे संगणक प्रशिक्षक आहेत)

Web Title: I am angry, what should I do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.