आई राजा उदो उदो.......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:09 PM2018-10-25T14:09:23+5:302018-10-25T14:09:54+5:30
सकाळी साडेआठची विजापूर-औरंगाबाद गाडी सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर आली. स्टॅण्डवर प्रचंड गर्दी. आज शुक्रवार असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ लागलेली. सगळी ...
सकाळी साडेआठची विजापूर-औरंगाबाद गाडी सोलापूरच्या एसटी स्टॅण्डवर आली. स्टॅण्डवर प्रचंड गर्दी. आज शुक्रवार असल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ लागलेली. सगळी भाविक मंडळी, चांगलं चुंगलं कापडं घालून तुळजापूरला निघालेले. आम्ही नोकरीनिमित्त निघालेल्या बँक आणि एलआयसी कर्मचाºयांची पण हीच गाडी बरोबर दहा वाजता उस्मानाबादला पोहोचणारी, तेव्हाची एकमेव गाडी. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गाडीत चढताना किमान एक-दोन जणांची पाकिटं मारली जायची,ही या गाडीची खासियत. ही पाकिटं अगदी बंदोबस्तात मारली जातात हे आम्हाला नंतर समजलं,पण तोपर्यंत आम्ही सगळेजण किमान एका पाकिटाला आणि पाच पन्नास रुपयाला मुकलो होतो.
आता देवीचे भक्त गाडीत म्हणल्यावर त्यात जास्त संख्या बायकांचीच,इरकली साड्या, कपाळाला जुन्या रुपयाएवढं कुंकू,कुणीकुणी जटा ठेवलेल्या अशी गर्दी जास्त आणि अशी बाई शेजारी बसली की तिच्या डोक्यातून तेलाचा असा काही वास सुटायचा की अगदी मळमळून उलटी होते की काय, असं वाटायचं. पण नंतर या गोष्टीची सवय झाली,तशी या सगळ्या गोष्टीची सवय व्हायला लागली. एसटी कंडक्टर तर भारी सरावलेले होते. सोलापूर सुटलं की पंधराव्या मिनिटाला हगलूर नावाचं एक गाव आहे. पूर्वी एसटीला दरवाजा पाठीमागे असायचा,एखादी म्हातारी मुद्दाम पुढं जाऊन बसायची,साधारण हगलूर जवळ आलं की ती ‘एक पंढरपूर द्या म्हणायची’मग लोकं ओरडायची ‘ए म्हातारे,ही तुळजापूर गाडी हाय, उतर खाली़’
असं म्हणल्यावर ती खाली उतरायची.एकदा अशीच एक म्हातारी गाडीत बसली,हगलूर जवळ आल्यावर कंडक्टरला तिनं पंढरपूरचं तिकीट मागितलं तिला वाटलं नेहमीप्रमाणे गाडी थांबवतील, आपण उतरू खाली, पण गाडी काही थांबलीच नाही, लोक ओरडायला लागले कंडक्टर गाडी थांबवा,म्हातारीला पंढरीला जायचं आहे, चुकून ह्या गाडीत बसलीय. कंडक्टर विजापूरचा, कुछ नहीं भाईसाब, इसका गाव हगलुरीच है, हमेशा ऐसाच नाटक करती, या आनेके बादीच टिकट मांगती पंढरपूर का, हम उतार देते, सिधी घर जाती फुकट मे!
त्या दिवशी कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही चिडलेच होते, कंडक्टर ड्रायव्हरला म्हणला ‘इर्षादभाई आज इस्कु हम औरंगाबादकूच छोडेंगे, फिर जिंदगी मे फुकट ट्रॅव्हल नहीं करेंगी. सगळे लोक हसले, म्हातारी खाली उतरली गाडी पुन्हा सुरू झाली. तीन सीटच्या खिडकीला मी बसलेलो, मध्ये माझा एक मित्र बसलेला आणि पलीकडे जटा असलेली एक बाई बसलेली, कपाळभर कुंकू, गळ्यात सोन्याची बोरमाळ, माझा मित्र जरा जास्तच इरसाल होता, त्याचं काय झालं,तुळजापूर जवळ आलं आणि जसा तुळजापूरचा डोंगर दिसायला लागला की गाडीतल्या दोन-चार जणी, घुमायला लागायच्या.त्या दिवशी पण तेच झालं,आमच्या सीटवरची बाई,अळोखे पिळोखे देऊन जोरात घुमायला लागली,माझा मित्र त्या बाईला ऐकू जाईल अशा आवाजात मला म्हणाला,अबे सत्या, या बाईच्या गळ्यातली बोरमाळ कुठं गेली? पडली का काय? तशी ती बाई गपकन थांबली आणि गळ्यात चाचपून बघायला लागली बोरमाळ आहे की नाही ते, हाय हाय गळ्यातच हाय, असं म्हणून पुन्हा घुमायला लागली,आई राजा उदो उदो.......
- कवी सतीश वैद्य, सोलापूर