पंतांची टोपी घालून, भावनिक करून मलाही मते मागता आली असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:44+5:302021-04-05T04:19:44+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कै. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी कै. आ. भालके प्रमाणेच टोपी व पेहरावा ...
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कै. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी कै. आ. भालके प्रमाणेच टोपी व पेहरावा केल्याने वातावरण भावनिक झाले होते. त्याची चर्चा मतदारसंघात होत असताना आ. प्रशांत परिचारक यांनी त्याची खिल्ली उडविली.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील उमेदवार निश्चित होताच जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरणही तापत आहे. निवडणुका या विकासाच्या मुद्यांवर लढल्या पाहिजेत. एकमेकांच्या पायात पाय न घालता हातात हात घालून लोकांच्या प्रश्नासाठी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. म्हणूनच आम्ही कै. पंतांचा वारसा न सांगता दोन पावले मागे घेत समाधान अवताडेंना उमेदवारी दिली. तुम्ही साखर कारखाना बंद पाडणाराचे वारसदार आहात, असे म्हणत प्रशांत परिचारक यांनी भगीरथ भालके यांच्यावर पहिल्याच प्रचार सभेत जोरदार टीका केली. तसेच कै. भारत भालके यांच्या करकिर्दीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. त्यामुळे पोटनिवडणुकीतील प्रचार टोकाला जाण्याचे स्पष्ट झाले आहे. पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरू असलेल्या प्रचाराची धार पाहता शेवटच्या टप्प्यात आणखी रंगत येण्याची चिन्हे आहेत.
वादग्रस्त मंत्री, राज्य सरकारवरही परिचारकांची टीका....
राज्य सरकारमधील एक मंत्री १५-१५ दिवस गायब असतो, गृहमंत्री १०० कोटी गोळा करायला सांगतात, तर काही मंत्री आपल्या महिलांसोबत असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे राज्य सरकारचे काम कमी आणि इतर उद्योग जास्त अशी टीका धनंजय मुंडे, अनिल देशमुख, संजय राठोड यांचे नाव न घेता आ. प्रशांत परिचारक यांनी केली होती. त्यामुळे या टीकेला सत्ताधारी महाविकास आघाडीकडून कसे आणि कधी उत्तर दिले जाते याबाबत उत्सुकता आहे.