माझं काही खरं नाही.. मुलाबाळांना सांभाळा म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:42+5:302021-04-07T04:22:42+5:30
बार्शी : ‘माझं काही खरं नाही, मी आता जगत नाही, माझ्या मुलांना सांभाळा, तुम्हीही व्यवस्थित रहा’ अशी बडबड ...
बार्शी : ‘माझं काही खरं नाही, मी आता जगत नाही, माझ्या मुलांना सांभाळा, तुम्हीही व्यवस्थित रहा’ अशी बडबड करीत चिखर्डेच्या तरुणानं कोरोना आजाराला घाबरुन साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपला जीव गमावला. ही धक्कादायक घटना येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधील विलगीकरण कक्षात घडली. त्याच्यावर येथे औषधोपचार सुरु होते.
उमेश भागवत कोंढारे (वय ३७, रा.चिखर्डे, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याने संबंधित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत उमेश कोंढारे हा ३१ मार्च रोजी चाचणीत करोना पॉझिटिव्ह आला. चार दिवस त्याने त्याच्या घरीच औषध उपचार घेतले. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ३ एप्रिलपासून बार्शी येथील विलगीकरण कक्षात औषध उपचारासाठी दाखल केले होते. त्याचबरोबर आई, पत्नी व दोन मुले यांचीदेखील तपासणी केली असता ते देखील पॉझिटिव्ह आले. त्यांना देखील याच केंद्रात औषधोपचारासाठी दाखल केले होते.
याबाबत मयताची आई व पत्नी यांचे व्हिडिओ ग्राफी केलेले जबाब नोंदविण्यात आले आहेत. अधिक तपास बार्शी पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजित धाराशीवकर,प्रताधिक्कारी हेमंत निकम, निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तहसीलदार सुनील शेरखाने आदींनी भेटी देऊन पाहणी केली. या घटनेमुळे विलगीकरण केंद्रातील अन्य रुग्णांमधून भीती व्यक्त केली जात आहे.
---
तो म्हणायचा, मी आता जगत नाही!
५ एप्रिल रोजी सायंकाळपासूनच या कक्षात तो सतत बडबड करत होता. माझे काही खरे नाही... मी आता जगत नाही, मला टेन्शन आले आहे, माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळा व तुम्ही व्यवस्थित रहा, अशाप्रकारे बडबड करत होता. मंगळवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याने इमारतीत पहिल्या मजल्यावर जाऊन तेथील बाथरूम जवळ साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.