मला घटस्फोट नको, नवºयाच्या घरी नांदायचंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 03:06 PM2019-08-06T15:06:49+5:302019-08-06T15:13:50+5:30
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील शोषित महिलेची मागणी; जात पंचायतीच्या निर्णयामुळे झाला होता काडीमोड
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जात पंचायत व सासरकडील लोकांनी माझा घटस्फोट करून दिला. त्यांच्या संगनमतानेच हे झाले आहे. कुणाला शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं नाही तर मला फक्त नवºयाच्या घरी नांदायचंय, अशी विनवणी शोषित महिलेने केली.
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथे गोसावी समाजातील जात पंचायतीने महिलेची मागणी नसताना घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. शोषित महिलेच्या पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने त्याचे आई-वडील व पंचायतीतील लोकांनी जबरदस्तीने घटस्फोट झाल्याचे सांगितले. यावर त्या महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. आपले म्हणणे मांडताना शोषित महिलेने कुणाला शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी नसून फक्त मला व माझ्या तीन महिन्यांच्या मुलाला स्वीकारावे एवढेच, असे शोषित महिलेने सांगितले.
शोषित महिलेचा विवाह जात पंचायतीने लावून दिला. या विवाहानंतर शोषित महिलेस तीन महिन्यांचे मूलदेखील आहे. असे असतानाही शोषित महिलेच्या नवºयाने तिला घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला; मात्र यास नकार दिल्यानंतर त्याने जात पंचायतीकडे धाव घेतली. शोषित महिलेला कल्पना न देता परस्पर जात पंचायतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. जात पंचायतीची प्रथा व परंपरा अनुसार आम्हाला अधिकार असल्याचे जात पंचायतीच्या प्रमुखाने सांगितले होते. घटस्फोट देऊ नका असे म्हणत जात पंचायतीसमोरवारंवार विनवण्या केल्या, पंचाचे पाय धरले, तरी देखील जात पंचायतीने घटस्फोट झाल्याचे सांगितले.
शोषित महिलेचे माहेराकडील लोक हे भंगार विकून गुजराण करतात. असे असताना आता मुलगी व तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी शोषित मुलीच्या पालकांवर आली आहे.
आधार कार्ड काढून घेतले, लग्नाचे फोटोही जाळले
- आपल्या मुलाचे दुसरे लग्न करायचे असल्याने पहिले लग्न मोडावे लागणार होते. यासाठी मुलाच्या लग्नाचे पुरावे नष्ट करणे गरजेचे होते. शोषित महिलेचे लग्न झाल्यानंतर काही फोटो काढण्यात आले होते. याचा भविष्यात पुरावा म्हणून वापर होऊ शकतो, म्हणून महिलेच्या सासरकडील लग्नाचे फोटो जाळून टाकले. तसेच आधार कार्डही शोषित महिलेस दिले नाही. शिक्षणाचे प्रमाण खूप कमी असल्याने लग्नपत्रिका काढलीच नसल्याचे शोषित महिलेने सांगितले.
मुलीच्या घरावर टाकला बहिष्कार
- शोषित महिलेने जात पंचायतीचे म्हणणे न ऐकता पोलिसात धाव घेतली. जात पंचायतीच्या विरोधात जाऊन पाऊल उचलले म्हणून शोषित महिलेच्या घरावर जात पंचायतीने बहिष्कार टाकला आहे. समाजातील लोकांना शोषित महिलेच्या कुटुंबीयांशी कोणतेही व्यवहार करु नका अशी धमकी दिली आहे. त्यामुळे गोसावी समाजातील लोक त्या शोषित महिलेच्या घरातील सदस्यांशी बोलत नसल्याचे भटक्या व विमुक्त जाती संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले.
सांगवी गावामध्ये अजूनही परस्पर घटस्फोट देण्याचे प्रकरण होणार होते; मात्र सध्या वृत्तपत्रात येणाºया बातम्या व पोलिसांची भीती यामुळे सध्यातरी जात पंचायतींनी या प्रकरणातून माघार घेतल्याने दोन महिलांचा घटस्फोट झाला नाही. सध्या जात पंचायतीतील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. सर्वच समाजात असलेली जात पंचायत नष्ट झाल्यास कुणावरही अन्याय होणार नाही.
- बाळकृष्ण जाधव,
जिल्हाध्यक्ष, भटक्या व विमुक्त जाती संघ.