भाजपच्या मतदारवाढीच्या चमत्काराचा मी शोध घेतो; अरूण लाड यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:54 PM2021-02-08T17:54:50+5:302021-02-08T17:55:16+5:30
अरुण लाड : महाआघाडीतील नेत्यांशी साधला संवाद
सोलापूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी पुण्यातील पदवीधर मतदारांची संख्या ५७ हजार होती. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी ही संख्या १ लाख ३४ हजारावर नेऊन ठेवली. भाजपच्या लोकांनी हा चमत्कार कसा साधला याचा शोध घेतोय, असे पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, विलास लोकरे आदी उपस्थित होते. लाड म्हणाले, भाजपच्या लोकांनी मतदार वाढविले मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही. लोक त्यांच्या विरोधात आहेत हे या निवडणुकीतून लक्षात आले. चंद्रकांत पाटील यांनी आमदार असताना पदवीधरांसाठी एकही काम केले नाही. महाआघाडी एकत्र आल्याने आमचा विजय झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडीच्या नेत्यांनी आघाडी टिकवली पाहिजे. मोदी सरकार देशाला नेस्तानाबूत करीत आहे. आमच्या हक्काची शेती काढून अदानी-अंबानीला द्यायचे चालले आहे. हे सगळे धोकादायक आहे. सगळा देश अस्वस्थ आहे. महाआघाडीचे लोक वेगळे लढले तर भाजप निवडून येईल, असेही लाड म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये वीज वापरली ना...
लॉकडाऊनमधील वीजबिल माफीबाबत आमदार लाड म्हणाले, याबद्दल आम्ही काय बोलणार नाही. लॉकडाऊन झाला तरी या काळात लोकांनी वीज वापरली. शासनाने काही सवलती दिल्या पाहिजेत. आमदार संजय शिंदे यांनीही यावेळी शासनाने वीजबिलांबाबत जाहीर केलेल्या सवलतींची माहिती दिली.
लोकांसाठी काम करा : आडम
आमदार लाड यांनी रविवारी महाआघाडीतील काँग्रेस, शिवसेना नेत्यांशी संवाद साधला. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी या बैठकीत सहभागी होऊन लाड यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीत रमलेल्या लाड यांनी लोकांसाठी काम करावे, असा सल्लाही आडम यांनी दिला.