शाळेतील परीक्षा मला साडेसाती वाटायची, सुशीलकुमार शिंदेंची प्रांजळ कबुली, सोलापूर लोकमत कार्यालयात साधला बाल पत्रकारांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:05 PM2017-11-15T12:05:06+5:302017-11-15T12:07:30+5:30
मला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा यायचा. दहावीत नापास झालो. पण प्रयत्न सोडले नाहीत. वर्षभर अभ्यासाचा कंटाळा करायचो. पण परीक्षा जवळ आली की, रात्रंदिवस अभ्यास करायचो. परीक्षा ही आपणाला साडेसाती वाटायची. ती आलीच कशाला, असेही वाटून जायचे, अशी प्रांजळ कबुली राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : मला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा यायचा. दहावीत नापास झालो. पण प्रयत्न सोडले नाहीत. वर्षभर अभ्यासाचा कंटाळा करायचो. पण परीक्षा जवळ आली की, रात्रंदिवस अभ्यास करायचो. परीक्षा ही आपणाला साडेसाती वाटायची. ती आलीच कशाला, असेही वाटून जायचे, अशी प्रांजळ कबुली राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.
बालक दिनाचे औचित्य साधून लोकमत बालपत्रकारांनी त्यांची लोकमत कार्यालयात भन्नाट मुलाखत घेतली. या बालपत्रकारांच्या गुगली प्रश्नांवर उत्तरांचे षट्कार ठोकत ही मुलाखत तब्बल तासभर रंगली. या मुलाखतीतून लहानपणचे सुशीलकुमार सहजपणे उलगडत गेले. माजी आमदार दिलीप माने, चेतन नरोटे, अमोल बंगाळे यांच्यासह लोकमतचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बालपणातील अंतरंग उलगडणाºया या मुलाखतीतून बालपत्रकारांनी त्यांच्या बालजीवनाचा वेध घेतला. शिक्षणापासून राजकारणातील प्रवेशापर्यंतची चर्चा रंगली. लिटिल फ्लॉवर हायस्कूलची नवव्या वर्गातील गौरी पवारच्या प्रश्नावर शिंदेंनी परीक्षेबद्दल वाटणाºया भीतीची कबुली दिली. ते म्हणाले, सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत काम करायचो. रात्रशाळेत शिकलो. घासलेटवर जळणाºया चिमणीच्या प्रकाशात अभ्यास केला. अभ्यासाचा कंटाळा यायचा तो दिवसभराच्या कामामुळे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरही काम सुटले नाही. सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोकरी करून रात्री अभ्यासाला वेळ दिला.
नीलकंठेश्वर प्रशालेच्या नवव्या वर्गातील किरण जाधवने त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, राजकारणात ठरवून नव्हे तर अपघाताने आलो. पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना राजकीय मंडळींनी पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. जोखीम पत्करून नोकरी सोडली आणि राजकारणात प्रवेशलो. पण आपणास मिळणारे तिकीट दुसºयालाच दिले गेले. तिकीटही गेले, नोकरीही गेली. मात्र प्रयत्न सोडले नाहीत. आपले राजकारणातील पहिले पाऊल अपयशाचे असले तरी पुढे मात्र यशच मिळत गेले.
राजकारणात का आलात, या प्रणव बशेट्टीच्या (सिंहगड पब्लिक स्कूल) उत्तरात शिंदे म्हणाले, बी.ए.ला शिकताना राज्यशास्त्र विषय होता. डावी विचारसरणी ठासून भरली होती. मुंबईत नोकरी करत असताना नकळतपणे याच विचारसरणीतून राजकारणात आलो.
ऋचा इकारेने शाळेतील आवडीचा विषय विचारला असता ते म्हणाले, मराठी हा आपला आवडीचा विषय होता. पुढे प्रयत्न करून इंग्रजीतही यश मिळविले. प्रा. कस्तुरे यांची मराठी सुंदर होती. त्यांचा प्रभाव पडला. आपणास मोर अधिक आवडतो, त्याची पिसं आपण पुस्तकात ठेवायचो. आताही मोराचा नाच पाहताना भान हरपते, असे प्रांजल अनिल जोशी हिच्या प्रश्नावरील उत्तरादाखल ते म्हणाले.
आपण शिकताना सिनेमे पाहायचो. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपतानाही हेमामालिनी, वैजयंतीमाला आठवायच्या. ते वयच तसे होते. त्यांचे चित्रपटही पाहायचो, अशी गुजगोष्ट त्यांनी ऐश्वर्या मोहितेच्या प्रश्नावरील उत्तरादाखल सांगितली.
मधल्या सुटीत काय करायचे, खोड्या करायचे का हे प्रश्न चेतन झाडे आणि श्रेयस होनराव यांनी विचारले. त्यावर शिंदे म्हणाले, आपण मधल्या सुटीत मित्रांना घेऊन चकाट्या पिटायचो. खोड्या काढण्याची सवय होतीच, महत्त्वाचे म्हणजे वर्गात भांडणे झाली की दुपारच्या सुटीत ते मित्रांना घेऊन निपटवायचो.
प्रतीक देवकतेच्या प्रश्नावर ते म्हणाले, नाईट स्कूलमध्ये असतानापासूनच अब्राहम लिंकनबद्दल ओढ आहे. पंडित नेहरू, विनोबा भावे हे सुद्धा आपले आदर्श आहेत. विनोबाजींना अनेकदा भेटलो आहे.
कोणता अनुभव महत्त्वाचा वाटतो, या समर्थ चौगुलेच्या प्रश्नावर ते म्हणाले, मला हवी तशी पत्नी मिळाली. ती प्रेम करून मिळविली. आंतरजातीय लग्न केले. ती मुंबईत भेटली असली तरी पहिली भेट सोलापुरात झाली, ही आठवण आणि अनुभव महत्त्वाचा वाटतो. जातीसंस्था नष्ट होण्यासाठी आंतरजातीय विवाहाची संकल्पना आपणास पटते. प्रेमात त्याग असतो. ते टिकविण्याची तयारी मात्र हवी.
स्मार्ट सिटीबद्दल अनुष्का बिराजदार हिने प्रश्न विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, ही चांगली संकल्पना आहे. नव्या योजना जरूर याव्यात, मात्र जुन्यांचेही जतन त्यात व्हावे. रस्ते, आरोग्य, वीज, पाणी या गरजा स्मार्ट सिटीतून पूर्ण व्हाव्यात.
नीलकंठेश्वर प्रशालेच्या गायत्री लगशेट्टीने युवकांसाठी संदेश विचारला. ते म्हणाले, हा देश सर्वधर्मसमभावाचा आहे. तरुणांनी आपली मूठ उघडावी. त्यात आपले भविष्य शोधावे. जात-धर्माच्या भिंती ओलांडून न घाबरता स्वाभिमान आणि कर्तृत्वातून आपले भविष्य घडवा, असा संदेश त्यांनी दिला.
तब्बल तासभर रंगलेल्या या मुलाखतीचे प्रश्न काही संपेनात. अखेर आता शेवटाचा प्रश्न, अशी सूचना देत शिंदेंनी मुलाखत आटोपती घेतली. पुढच्या वेळी तयारी करून येण्यापेक्षा मनाला पटतील आणि वेळेवर सुचतील ते प्रश्न विचारा, अशी मुभा त्यांनी या बालपत्रकारांना दिली. वाचन जोपासा, पत्रकारिता हा सर्वव्यापी व्यवसाय आहे. त्यातून समाजाचे हित सांभाळा आणि जोपासा, असा सल्ला त्यांनी जाताना दिला. बालदिनी राबविलेल्या ‘लोकमत’च्या या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले.
-------------------
गरिबी खूप काही शिकविते
आपण लहानपणी बुढी के बाल विकायचे, ते विकायचे किती आणि खायचे किती या सौम्या शिरीष मोहोळकरच्या (आठवी, बी.एफ. दमाणी हायस्कूल) प्रश्नावर ते भावुक झाले. म्हणाले, तेव्हा पायात चप्पल नसायची. अंगावर धड कपडेही नसायचे. तरीही ते दिवस सोन्याचे होते. गळ्यात बुढी के बालचा डबा असूनही ते खायची कधी इच्छाच झाली नाही. कारण, त्याचे दोन पैसे भरून द्यावे लागायचे. त्यामुळे मनाला मारून ते विकत फिरायचो. जवळ असूनही खाता येत नव्हते. गरिबी खूप काही शिकवून जाते, हेच खरे!
------------------------------
प्रणिती आपली शिक्षिका
आपल्या मुलींना कधी शिक्षा केली का, या साक्षी सोनवणेच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, राजकारणात जबाबदारीच्या पदावर असल्याने मुलींचा सहवास जास्त मिळाला नाही. मात्र प्रत्येक वेळी आपण त्यांचे हट्ट पुरवायचो. प्रणितीचे निरीक्षण जबरदस्त होते. ती आधी इंग्रजीतच बोलायची. आता मराठीही अस्खलित बोलते. तिला मारायची वेळ कधी आलीच नाही. मला इंग्रजीचे शब्द अडले की तिच्याकडून समजून घेत होतो. ती आपली शिक्षिका होती. शिक्षिकेला कोणी मारतं का?