साखर कारखान्यात नोकरी लागली, पगाराच्या आकड्यासह मित्रांनी बॅनरबाजी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:24 AM2020-09-02T11:24:01+5:302020-09-02T11:30:50+5:30
कोरोना महामारीच्या संकटात देशातील-राज्यातील अनेक उद्योग ठप्प झाले असून कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेनच्या पुढील टप्प्यात आता उद्योगधंदे आणि खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे
सोलापूर- राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची मोठी उलाढाल सोलापूर जिल्ह्यात होते. त्यामुळे, साखर सम्राटांच्या या जिल्ह्याची महाराष्ट्राला गोडी आहे. उजनी धरणाचं वरदान लाभलेल्या सोलापूरमधील कुर्डूवाडी तालुक्यातही जवळपास 3-4 साखर कारखाने आहेत. येथील राजकीय मंडळींचं साखर उद्योगावर चांगलंच प्रभुत्व आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि येथील नागरिकांचा थाटच वेगळा असतो. सोलापूर जिल्ह्यातील एका युवकास साखर कारखान्यात नोकरी लागल्यानंतर तेथील तरुणांनी चक्क बॅनरबाजी करत अभिनंदन केलंय.
कोरोना महामारीच्या संकटात देशातील-राज्यातील अनेक उद्योग ठप्प झाले असून कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेनच्या पुढील टप्प्यात आता उद्योगधंदे आणि खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, नोकरी नसणारे तरुण नोकरी शोधत आहेत. त्यातच, उद्योगधंदे पुन्हा सुरू झाल्याने काही ठिकाणी नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ (सिना) येथील एका युवकाला साखर कारखान्यात नोकरी मिळाली. विशेष म्हणजे चांगल्या हुद्द्यावर 5 आकडी पगारही देण्यात आला. त्यामुळे, विशाल बारबोले नावाच्या युवकाचे त्याच्या मित्रपरिवाराकडून गावात डिजिटल बॅनर झळकावून अभिनंदन करण्यात आले.
माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. पिंपरीतील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल नोकरीस लागला. अनेक वर्ष कामही केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. त्यामुळे, इतर ठिकाणी विशेषत: आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटरपदी विशालला नोकरी मिळाली. मित्राला चांगली आणि आपल्याच गावापासून जवळ नोकरी मिळाल्याचा आनंद त्याच्या मित्रांनाही झाला. त्यामुळे मित्रांनी गावातील चौकात डिजिटल बॅनर झळकावत विशालचे अभिनंदन केले.
एमपीएससी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे बॅनर झळकावून केले जाते. मात्र, साखर कारखान्यात 14,500 रुपये प्रतिमाहची नोकरी लागल्यामुळे मित्र परिवाराने बॅनरबाजी करुन कौतुक व अभिनंदन केल्याची घटना केवळ सोलापूरातच घडू शकते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.