कर्त्यासवरत्या पोराला ५०० फूट फरफटत नेलं,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:20+5:302021-05-25T04:25:20+5:30
सुस्ते : दोन मुलं आणि आई दुचाकीवरुन सुस्ते येथे मुलीला भेटून परत पेनूर गावाकडं निघाले. रविवारी सायंकाळच्या वेळी तुंगत ...
सुस्ते : दोन मुलं आणि आई दुचाकीवरुन सुस्ते येथे मुलीला भेटून परत पेनूर गावाकडं निघाले. रविवारी सायंकाळच्या वेळी तुंगत टोलनाक्याजावळ समोरुन इथेनॉल वाहतूक करणारा टँकर आला. काही समजण्याच्या आतच दुचाकीस्वाराला तब्बल ५०० फुटापर्यंत फरफटत नेलं. यातच कर्तृत्वाला आलेलं पोरंग जागीच गेलं. संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईनं दवाखान्यात उपचार घेताना प्राण सोडला. दुसरा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. कोरोनाच्या संकट वाघमोडे कुटुंबीयांवर हे संकट कोसळलं.
शंकर यल्लाप्पा वाघमोडे (वय१९), शालन यल्लाप्पा वाघमोडे (वय ३४) ही मृत्यू झालेल्याची तर सागर यल्लाप्पा वाघमोडे (वय १४) गंभीर जखमीचे नाव आहे.
सोलापूरहून एम.एच ०४ एच. डी. ६९१५ क्रमांकांचा इथेनाॅल टॅंकर पंढरपूरकडे भरधाव वेगाने येत होता. यावेळी क्रमांक एम.एच १३ सी. एफ ६४५५ दुचाकीवरून पेनूरकडे जात होते. यावेळी टँकरची आणि दुचाकी समोरासमोर जोराची टक्कर झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की, टँकरने मोटारसायकला जवळपास पाचशे फुटापर्यत फरफटत नेले. यात शंकर यल्लाप्पा वाघमोडे (वय १९) हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला तर शालन यल्लाप्पा वाघमोडे (वय ३४) यांना उपचारासाठी पंढरपूर येथील जिल्हा उपरूग्णालय दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सागर यल्लाप्पा वाघमोडे (वय १४) गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी पंढरपुरात दाखल केले होते. एकाच वेळी मायलेकराचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पेनूर परिसरात व सुस्ते येथील वाघमोडे यांच्या नातेवाईकावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.
---
प्रकृतीत सुधारणा
जखमी
सागर यल्लाप्पा वाघमोडे (वय १४) याला रविवारी झालेल्या अपघातात बेशुध्द अवस्थेत पंढरपूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे त्याचे नातेवाईक कुमार वाघमोडे यांनी सांगितले.
----
रस्त्यावर गती रोधकची मागणी
सध्या पंढरपूर- मोहोळ या पालखी मार्गाचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. कामात अडथळा येत असल्याने काही ठिकाणी वन वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पालखी मार्ग नवीन असल्याने वाहान चालकांना वेगाचे भान राहात नाही. या मार्गावरून वाहने अति वेगाने धावताना दिसून येत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी व वनवेवर अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी जागोजागी गतिरोधक करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरु लागली आहे.
-----
संसाराचा गाडा हाकणारी माऊली अन् लेक गेला
अपघातात मृत्यू पावलेले मायलेक नंदीवाले समाजाचे. काळानुरुप त्यांचा पारंपरिक व्यवसाय बंद पडल्यामुळे दररोज मिळेल तेथे मोलमजुरी गुजराण करणारं कुटुंब. अशा स्थितीत हाताला आलेला मुलगा गेला, संसाराचा गाडा हाकणारी पत्नीही गेल्यानं यल्लप्पा वाघमोेडे यांनी शोक व्यक्त केला. मुलीला निमित्त झालं अन् शालन वाघमोडे या माऊलीला अन् शंकर वाघमोडे यांना काळानं घेऊन गेल्यानं वाघमोडे कुटुंबीयावर संकट कोसळले.