पैसा जास्त हवाय.. चला नदीतच वाळू चाळू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:18 AM2021-04-03T04:18:55+5:302021-04-03T04:18:55+5:30
भीमा, सीना नदीबरोबरच बोरी, हरणा नदीतून ही वाळू चोरी होत आहे. वाळू चोरीत आता स्थानिकांनी प्रवेश केला आहे. ...
भीमा, सीना नदीबरोबरच बोरी, हरणा नदीतून ही वाळू चोरी होत आहे. वाळू चोरीत आता स्थानिकांनी प्रवेश केला आहे. यामुळे या नदीतून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अनेक दिवसांपासून केवळ भीमा, सीना या दोनच नद्यांमधून वाळूची चोरी होत होती. आता नव्याने बोरी नदीतूनसुद्धा मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. यावर्षी बोरी नदीला महापूर येऊन गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू आली आहे. ठिकठिकाणी वाळूसाठा तयार झाला आहे. बोरी नदीतून लिलाव प्रक्रिया किंवा वाळू उपसा कधीच होत नव्हता. मात्र, सध्या नदीतील पाणी आटले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक ट्रॅकरमार्फत रोज दिवस, रात्र चोरट्या मार्गाने वाळू चाळून उपसा करीत आहेत. याला काही शेतकरी विरोध करीत आहेत. मात्र, त्यांना धमकावल्याने ते शांत आहेत.
...या गावातून वाळू चोरी
बोरी नदीतून अरळी, दर्शनाळ, पितापूर, मैंदर्गी, जकापूर, बिंजगेर या गावाजवळील नदीतून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक होत असून, बिंजगेर येथे ७ ट्रॅक्टर, मैंदर्गीत ११, जकापूर येथे ५, दर्शनाळ - अरळी- पितापूर येथे ४ अशा प्रकारे ट्रॅकरमार्फत वाळू वाहतूक केली जात आहे. ही वाळू नदीपात्रातच चाळणीने चाळली जाते. यामुळे या वाळूला जास्तीचा भाव मिळत आहे. तसेच खानापूर, हिळळी, गुद्देवाडी याही ठिकाणातून वाळू चोरी सुरु आहे.
फोटो
०२अक्कलकोट- वाळू चोरी
ओळी
मैंदर्गी येथील बोरी नदीत चाळणीने वाळू चाळून विक्रीसाठी नेली जात आहे.