स्वस्तात सोन्याचा मोह पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:00+5:302021-09-07T04:28:00+5:30
मुखेडच्या सराफाला महागात लोकमत न्यूज नेटवर्क कामती : नांदेड जिल्ह्यात मुखेड येथील एका सराफाला स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करीत ...
मुखेडच्या सराफाला महागात
लोकमत न्यूज नेटवर्क
कामती : नांदेड जिल्ह्यात मुखेड येथील एका सराफाला स्वस्तात सोने देण्याचा बहाणा करीत बोलावून घेऊन मोहोळ तालुक्यातील इंचगाव-येणकी रस्ता रस्त्यावर निर्जनस्थळी धक्काबुक्की करून खिशातून रोख १ लाख ८० हजारासह ३ लाख १२ हजारांचे सोने लुटले. या प्रकारानंतर फसलेले सराफ रमेश भगवानराव अंबेकर (वय ४४, रा. महाजन पेठ, मारुती मंदिराजवळ, मुखेड, जि. नांदेड) यांनी कामती पोलिसात धाव घेतली.
पोलीस सूत्रानुसार रमेश यांचे मुखेड तालुक्यात पीर सावरगाव येथे पूजा ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ओळखीच्या ज्योती शिंदे (रा. होंडाळा, ता. मुखेड) या सोने-चांदी खरेदीसाठी तीन वर्षांपासून येत होत्या. एक दिवस ज्योती शिंदे या त्यांच्या बरोबर तिची बहीण म्हणून नंदिनी नामक महिलेस घेऊन आल्या. ती सोलापूर जिल्ह्यात राहत असल्याचे सांगितले.
घरगुती अडचण असल्याने त्यांनी स्वत:कडील सोन्याच्या अंगठ्या व पाटल्या हे दागिने कमी पैशामध्ये देतो सांगून जवळीकता साधली. त्या दोघी दुकानामधून निघून गेल्या. मोबाईलवरून वारंवार फोन येऊ लागला. त्याने नंदिनीचा नवरा संतोष बोलत असल्याचे सांगून स्वत: खूप अडचणीत आहे, तुमचादेखील फायदा करतो व कमी भावामध्ये सोने देतो सांगू लागला.
५ सप्टेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता रमेश व त्यांची पत्नी धनश्री यांनी मिळून मुखेड येथून सोलापूरला निघाले. दुपारी १२.३० वाजता सोलापुरात आले. येथे आल्यानंतर संतोषचा पुन्हा फोन आला. बेगमपूर (ता. मोहोळ) गावच्या बसमध्ये बसण्यास सांगून इंचगाव येथे उतरण्यास सांगितले. काही वेळाने संतोष याने आकाश नावाचा मुलगा फोन करेल असे सांगत तुम्ही त्याच्याबरोबर जाण्यास सांगितले. नंतर आकाश नावाच्या व्यक्ती फोन करून आला.
तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणत त्याने बिगर क्रमांकाच्या मोटारसायकलवर घेऊन येणकी रोडने इंचगावपासून दोन किमी अंतरावर नेले आणि तीन लाख लुटले.
---
धक्काबुक्की करून काढली रक्कम
आकाश नामक व्यक्तीने रमेश यांना मोटारसायकलवर बसवून इंचगावापासून दोन किमी अंतरावर निर्जनस्थळी आणले. रस्त्यावर गाडी थांबवून कडेला उसाच्या फडाजवळ नेऊन धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील रोख १ लाख ८७ हजार रुपये, ८० हजारांचे दोन तोळे सोने, चांदीचा मुद्दा, मोबाईल अशा प्रकारे ३ लाख १२ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर तो मोटरसायकलवरुन निघून गेला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.